मुंबई : मुंबईच्या गल्लीबोळात राहणाऱ्या तरुणाईच्या मनाती स्वप्नांना भरारी देत, त्याच स्वप्नांचा आधार घेत यशशिखरापर्यंत पोहोचण्याची एक वास्तवदर्शी कथा झोया अख्तर हिने 'गली बॉय' या चित्रपटातून साकारली. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक कलाकारांच्या उल्लेखनीय भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या चित्रपटाने आणखी एक मजल मारली मारली आहे. ९२ व्या अकॅडमी अवॉर्ड्स म्हणजेच ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची प्रवेशिका म्हणून 'गली बॉय'ची निवड करण्यात आली आहे. 'बेस्ट फॉरेन लँग्वेज' या विभागात प्रवेशिका रुपात चित्रपटाची निवड करण्यात आल्याचं कळत आहे. 



रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. तर, रॅप प्रकारातील क्षेत्रात कशा प्रकारे मुंबईच्या गल्लीबोळातील मुलं पुढे येऊन आपलं वेगळेपण सिद्ध करतात हे सिद्ध करत या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी झोया अख्तरने पार पाडली होती. गली बॉयच्या या यशाविषयी माहिती देत फरहानने एक ट्विटही केलं, ज्यामध्ये त्याने चित्रपटासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचेच मनापासून आभारही मानले. 


'गली बॉय'च्या निमित्ताने मुराद, सफिना, एम.सी.शेर, अशी पात्र रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यांना साथ होती ती म्हणजे लोकप्रिय रॅपर्स नॅझी आणि डिव्हाईन यांच्या खऱ्याखुऱ्या यशोगाथेची, संघर्षाची.