What Not To Store in Fridge: पदार्थ खराब होऊ नये यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवतात. कधीकधी जास्त प्रमाणात पदार्थ केल्यानंतर ते खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवण्यात येतात. पण सगळेच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे कधीकधी हानिकारक ठरु शकते. काही खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यास ते विषारी ठरु शकतात. अशावेळी हे पदार्थ खाल्ल्यास शरीरासाठी नुकसानदायक ठरु शकते. हे विषारी पदार्थ शरीरासाठी खतरनाक असतात आणि शरीरात जाताच कँन्सरच्या पेशी तयार होण्यास सुरुवात करतात. त्यामुळं फ्रीजमध्ये कोणते पदार्थ ठेवू नये याबाबत आम्ही आज माहिती सांगणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुर्वेदिक तज्ज्ञ आणि गट हेल्थ कोच डॉ. डिंपल जांगडा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी चार असे पदार्थ सांगितले आहेत जे फ्रीजमध्ये स्टोअर करणे हानिकारक ठरु शकते. तज्ज्ञांनी सांगितलेल्या हे पदार्थ आपल्या रोजच्या स्वयंपाकात नेहमीच वापरले जातात. त्यामुळं यातील एकही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे घातक असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले आहे. कोणते आहेत हे पदार्थ आणि त्याचे शरीराला कोणते नुकसान होतात हे जाणून घेऊया. 


लसूण


डॉ. डिंपल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोललेला लसूण कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये. या लसणाला लगेचच बुरशी पकडते. अनेक संशोधनात हे सिद्ध झालंय की, यामुळं कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. तसंच, बाजारातून कधीच सोललेला लसूण घेऊ नका. लसणाचा अखंड कांदा घेऊन गरज असल्यावरच लसूण सोला आणि नेहमी रुम टेम्परेचरवर स्टोअर करा. 


कांदा


कांदा हा रोजच्या भाजीसाठी लागणारा अविभाज्य घटक आहे. ऑफिसला जाणाऱ्या महिला कधीकधी आठवड्याभराचा कांदा सोलून फ्रीजमध्ये ठेवतात. मात्र, कांदा फ्रीजमध्ये ठेवणे योग्य नाही. कारण थंड तापमानात कांदे प्रतिरोधक असतात. जेव्हा तुम्ही कांदे फ्रीजमध्ये ठेवता तेव्हा त्यातील स्टार्चचे शुगरमध्ये रुपांतर होते आणि लवकर बुरशी लागते. काही जण अर्धा कापलेला कांदाही फ्रीजमध्ये ठेवतात त्यामुळं वातावरणातील विषारी बॅक्टेरिया त्यात जातात.


आलं


जेव्हा तुम्ही आलं फ्रीजमध्ये ठेवतात तेव्हा वेगाने त्याला बुरशी लागण्यास सुरुवात होते. त्यामुळं ते आलं खाल्ल्यास किडनी आणि लिव्हर फेल्युअरचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं आलं नेहमीच स्वच्छ व नॉर्मल टेम्परेचरवर स्टोअर करायला हवं. 


भात


ही चूक सर्वच घरात घडू शकते. शिजवलेल्या भाताला सगळ्यात लवकर बुरशी पकडते. 24 तासांपेक्षा अधिक काळ भात फ्रीजमध्ये ठेवणे टाळा. 



(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)