वडापाव खाताना आजोबांनी गिळला कवळीचा ‘दात’
वडापाव हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ....
मुंबई : वडापाव हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ....
अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सारेचजण चवीने वडापाव खाणे पसंद करतात. पण, हाच वडापाव मुंबईतील ७७ वर्षीय राम कुबेर यांना महागात पडला. वडापाव खावून कुबेर यांनी थेट रूग्णालयात दाखल झाले आहेत.
७७ वर्षीय राम कुबेर यांनी वडापाव खाल्ला. पण, यानंतर त्यांना पोटदुखी सुरू झाली. काही केल्या पोटदुखणं कमी होत नव्हती. शेवटी कुबेर यांना मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली तर कुबेर यांच्या पोटात काहीतरी अडकल्याचं समोर आलं. पण नेमकं काय हे सुरूवातीला समजलं नाही.
डॉक्टर काय म्हणाले?
सर जे.जे समुह रुग्णालयाच्या कान, नाक घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण माय मेडिकल मंत्राशी बोलताना म्हणाले की, “राम यांच्या पोटात दात अडकला असल्याचं आम्हाला समजलं. एक गोष्टी चांगली म्हणजे दात चुकुन गिळला गेल्याने त्यांना कोणतीही जखम झाली नाही. त्यांनी कवळी लावली होती. आणि त्या कवळीतला दात राम यांनी चुकून गिळला.”
राम रूग्णालयात आल्यानंतर त्यांना आपत्कालीन विभागात दाखल करून दुर्बिणीच्या सहाय्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या पद्धतीद्वारे एक नळी पोटात सोडून त्याद्वारे उपचार करतात.
डॉ. चव्हाण पुढे म्हणाले की, “दातांना लावण्यात येणारी कवळी ही मजबूत असते मात्र काही काळाने पकड कमकुवत होत जाते. यासाठी लोकांनी नियमितपणे दातांची तपासणी केली पाहिजे.”