मुंबई : कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात कोरोनाची चौथी लाट येणार का असा प्रश्न आहे. अशातच आता आरोग्यतज्ज्ञांनी मोठं विधान केलं आहे. भारतात कोरोनाची चौथी लाट येणार नसल्याचं म्हटलं आहे. IIT कानपूरच्या प्राध्यापकांनी चौथ्या लाटेची शक्यता नसल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोविडची चौथी लाट येण्याची शक्यता नाही असं आयआयटी कानपूरचे प्रोफेसर महिंद्र अग्रवाल यांनी म्हटलंय. डॉ. अग्रवाल यांचं मॅथेमॅटीकल मॉडेल देशात संदर्भ म्हणून वापरण्यात आलं होतं. देशात सध्या कोणताही नवा कोरोनाचा म्यूटंट आढळला नसल्याने भारतात चौथी लाट येण्याची शक्यता नाही असं त्यांनी म्हटलंय.


डॉ. अग्रवाल पुढे म्हणाले, देशात सध्या काही भागात कोरोना रूग्णसंख्येत वाढ होतेय. मात्र ही स्थितीही फार काळ टिकणार नाही. नागरिकांची कोविडविरोधी प्रतिकारशक्तीही मजबूत झाल्यामुळे कोरोनाची चौथी लाट येणार नाही. 


तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जर कोरोनाच्या म्यूटेंटमध्ये बदल झाले तर नवीन व्हायरस येतो. मात्र सध्या देशात जुने म्यूटंट दिसून येतात. 


दरम्यान यापूर्वी कानपूर IITमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून 22 जूनच्या आसपास देशात चौथी लाट सुरू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ओमायक्रॉनच्या XE या व्हेरियंटमुळे चौथ्या लाटेचा धोका वाढल्याचा निष्कर्ष या अभ्यासात काढण्यात आला होता. ऑगस्टमध्ये कोरोनाची चौथी लाट आपल्या सर्वोच्च बिंदूवर असेल, असाही अंदाज व्यक्त केला गेला होता.