निपाह व्हायरस पसरण्यामागील कारण शोधण्यासाठी डुक्कर, बकर्यांंचीही टेस्ट
केरळमध्ये `निपाह` व्हायरसच्या विळख्यात आल्याने 13 जणांनी प्राण गमावले आहेत.
मुंबई : केरळमध्ये 'निपाह' व्हायरसच्या विळख्यात आल्याने 13 जणांनी प्राण गमावले आहेत. केरळ पाठोपाठ आता गोव्यातही निपाह सदृश्य रूग्ण आढळल्याने भीतीचं सावट पसरले आहे. फ्रुट बॅट्स प्रजातीच्या वटवाघुळांमध्ये नैसर्गिकरित्या असणार्या या व्हायरसमुळे निपाह पसरत आहे. परंतू केवळ वटवाघुळ नव्हे तर त्याच्या संपर्कात येणार्या इतर प्राणी आणि मनुष्यामध्येही निपाहचा व्हायरस पसरत असल्याने धोका बळावला आहे.
नव्याने सुरू होणार टेस्ट
'निपाह'चा प्रमुख वाहक वटवाघुळ असले तरीही केरळमधील 'निपाह' पसरण्यमागे वटवाघुळ नसल्याने आता इतर प्राण्यांची तपासणी सुरू झाली आहे. 48 तासात उपचार न मिळाल्यास जीवघेण्या ठरणार्या निपाह व्हायरसच्या पसाराचं कारण शोधण्यासाठी बकरी,डुक्करं, वटवाघुळ आणि इतर प्राण्याचे नमुनेही पाठवण्यात आले होते मात्र नॅशनल इन्सिट्युट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसिज , भोपाळ यांनी ते नकारात्मक आल्याचे स्पष्ट केले आहेत. आता पेरंब्रा गावातील फ्रुट बॅट्स प्रजातीच्या वटवाघुळांचे सॅम्पल पुन्हा लॅबमध्ये पाठवले जाणार आहेत. या गावाच्या आसपासच्या भागात 'निपाह' व्यायरसचं थैमान पसरलं आहे.
हिमाचल प्रदेशातील रिपोर्ट निगेटीव्ह
हिमाचलप्रदेशातील शाळेच्या आवारात काही वटवाघुळं मरून पडली होती. या भागात निपाहचा रूग्ण आढळला नाही तसेच मेलेल्या वटवाघुळांचाही रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशात सध्या निपाहचा धोका नाही. केरळमध्ये 116 जणांवर निपाहची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी 15 जणांमध्ये 'निपाह' व्हायरस आढळला तर त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे.