वॅक्सिन घेतल्यानंतर होऊ लागला त्रास... समोर आली ही धक्कादायक समस्या
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही प्रमाणात त्याचे साईड इफेक्ट दिसणं सामान्य आहे.
मुंबई : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही प्रमाणात त्याचे साईड इफेक्ट दिसणं सामान्य आहे. दरम्यान एस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीमुळे काही लोकांमध्ये न्यूरोलॉजिकल डिसॉर्डरची समस्या देखील पहायला मिळतेय. न्यूज एजेंसीच्या अहवालानुसार, नर्वस सिस्टिमशी संबंधीत असलेल्या या समस्येचं नाव गुलियन बेरी सिंड्रोम असं आहे.
दोन विविध अभ्यासांच्या माध्यमातून, ही समस्या आतापर्यंत 11 लोकांमध्ये पहायला मिळाली आहे. यामध्ये 7 प्रकरणं ही भारतातील असून उर्वरित 4 प्रकरणं ही युकेच्या नॉटिंघममधील आहेत. या सर्वांनी ही समस्या उद्भवण्यापूर्वी 10-22 दिवसांपूर्वी एस्ट्राजेनेका ही लस घेतली होती. तर भारतात ही लस कोविशिल्ड नावाने देण्यात येत आहे.
गुलियन-बेरी सिंड्रोमच्या समस्येमध्ये शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली चुकून नर्वस सिस्टिमच्या काही भागांवर परिणाम करते. या नसा मेंदूत आणि पाठीच्या कण्याबाहेर असतात.
जर्नल एनल्स ऑफ न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या दोन्ही अभ्यासांमध्ये गिलाइन-बेरी सिंड्रोमसंदर्भात स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. अभ्यासानुसार, ही एक प्रकारची दुर्मिळ समस्या असून यामध्ये मुख्यतः चेहऱ्याच्या नसा कमकुवत होतात.
संशोधकांना असं आढळलं आहे की, या लसीच्या पहिल्या डोसच्या दोन आठवड्यांच्या आत बहुतेक लोकांना ही समस्या जाणवली. या सर्व 7 जणांमध्ये गुइलिन-बेरी सिंड्रोमची लक्षणं आढळली. या अभ्यासानुसार, या समस्येमुळे लोकांच्या चेहऱ्याचे दोन्ही किनारे कमकुवत होत असल्याचं आढळलं.
गुलियन-बेरी सिंड्रोम ही मज्जासंस्थेशी संबंधित एक समस्या आहे. सुरुवातीला शरीरात कमजोरी येते. चेहऱ्यावरील स्नायू कमकुवत होतात आणि हात आणि पाय मध्ये मुंग्या येऊ लागतात. काही लोकांमध्ये, यामुळे हृदयाचा ठोके अनियमित देखील होऊ शकतात. हे शरीरात पसरल्यावर अर्धांगवायू देखील होऊ शकतो.