पब्लिक टॉयलेटपेक्षाही जास्त घाणेरडे एअरपोर्ट ट्रे
...तर अनेक तऱ्हेच्या आजारांनाही तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं
नवी दिल्ली : तुम्ही जर बऱ्याचदा विमान प्रवासाचा अनुभव घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीही महत्त्वाची आहे. एका संशोधनानुसार, एअरपोर्टवर वापरण्यात येणारे प्लास्टिकच्या सिक्युरिटी ट्रे एखाद्या पब्लिक टॉयलेटच्या तुलनेत जास्त घाणेरडे असतात. 'युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंघम'नं हे संशोधन प्रकाशित केलंय.
एअरपोर्टवरच्या सिक्युरिटी ट्रेसोबत अधिक वेळा संपर्क आला तर अनेक तऱ्हेच्या आजारांनाही तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. यामध्ये असलेल्या जंतुंमुळे एखाद्या व्यक्तीला सर्दी-खोकला, निमोनिया आणि ब्लॅडर इन्फेक्शन यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात.
'युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंघम'च्या वैज्ञानिकांनी फिनलँडच्या हेलसिंकी वंता एअरपोर्टच्या वेगवेगळ्या जागांचे सॅम्पल गोळा केले होते. सॅम्पल टेस्ट दरम्यान वातावरणात 10 टक्के आणि हवेत 25 टक्क्यांपर्यंत वायरस आढळले. संशोधनात घशाला त्रास, ब्रोंकायटिस, डोळ्यांचे आजार, ब्लॅडर इन्फेक्शन, निमोनिया, ताप, पोटाचे विकार यांसोबतच ब्रेन डेमेजसारखे गंभीर आजार निर्माण करणारे वायरस आढळले.
जंतुसंसर्गामुळे निर्माण होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती व्हावी यासाठी या पद्धतीचं संशोधन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याचं, युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंघमचे प्रोफेसर जोनाथन वान टॅम यांनी म्हटलंय.