पाण्याचा प्रत्येक घोट ठरतोय जीवघेणा; कोट्यवधी भारतीयांवर घोंगावतोय किडनीच्या कर्करोगाचा धोका
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात पिण्याचं पाणी अनेकांच्याच जीवाला धोका निर्माण करत असल्याचं स्पष्ट होत आहे. देशात आर्सेनिकयुक्त पाणी ही एक गंभीर समस्या बनली असून, कैक राज्यं या जीवघेण्या समस्येशी सामना करत आहेत.
जल हेच जीवन, असं जरी म्हटलं जात असलं तरीही हेच जल, अर्थात पाणी भारतीयांच्या जीवाला धोका निर्माण करताना दिसत आहे. कारण ठरतोय तो म्हणजे या पाण्यात असणारा एक घटक. जलसंकटाशी झुंजणाऱ्या भारतात पाण्यातील आर्सेनिक हा विषारी घटक संकट आणखी गंभीर करताना दिसत आहे.
हा एक असा घटक आहे जो पाण्यात जास्त काळ राहिल्यास किडनी, त्वचा, फुफ्फुस आणि मुत्राशयाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरतो. आर्सेनिकयुक्त पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर दीर्घकालीन गंभीर परिणाम होतात.
संशोधन काय सांगते?
टेक्सासच्या ए अँड एम युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील संशोधनानुसार, आर्सेनिकयुक्त पाणी मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा धोका 6% ने वाढवते. 2011 ते 2019 या काळातील एका अभ्यासात 20 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सुमारे 1 लाख लोकांच्या माहितीचा आधार घेण्यात आला. त्यामध्ये 28,000 हून अधिक कर्करोगाच्या प्रकरणांचा अभ्यास केला गेला. ज्यापैकी अनेक प्रकरणांमध्ये आर्सेनिकयुक्त पाणी हा मुख्य कारणीभूत घटक असल्याचे आढळले.
भारतातील स्थिती काय?
देशातील पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यांमध्ये आर्सेनिकयुक्त पाण्याची समस्या अधिक गंभीर आहे. पश्चिम बंगालमध्ये सुमारे 96 लाख लोक दूषित पाण्याचा वापर करतात. तर, बिहारमध्ये सुमारे 12 लाख लोक, तर आसाममध्ये 16 लाख लोक आर्सेनिकयुक्त पाण्याचा वापर आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करत आहेत.
आर्सेनिकचे धोके:
आर्सेनिकयुक्त पाण्यामुळे मूत्रपिंड, त्वचा, फुफ्फुस आणि मूत्राशयाचा कर्करोग होण्याचा धोका असतो.
याशिवाय त्वचेचे विकार, श्वसनाचे आजार आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात.
जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने कर्करोगाचा हा प्रकार सातव्या क्रमांकावर गंभीर समस्या म्हणून ग्राह्य धरला आहे.
हेही वाचा: https://zeenews.india.com/marathi/health/heart-paitents-must-take-these-precautions-when-bathing-with-hot-water-in-winter/866352
उपाय काय?
1.जलशुद्धीकरण प्रकल्प: शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणे गरजेचे आहे.
2.पाण्याची तपासणी: हातपंप आणि टँकरमधील पाण्याची गुणवत्ता नियमित तपासली जावी.
3.जागरुकता: लोकांना आर्सेनिकच्या धोक्यांबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे.
4.जलस्रोतांचे संवर्धन: जलस्रोतांची नियमित साफसफाई आणि देखभाल केली पाहिजे.
आर्सेनिकयुक्त पाणी ही समस्या त्वरित सोडवणे आवश्यक आहे, अन्यथा येणाऱ्या काळात याचे दुष्परिणाम आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकतात.
(Disclaimer - वरील माहिती निरीक्षणपर संदर्भांवरून घेण्यात आली असून, 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)