Baba Ramdev Donkey Milk: योग गुरु बाबा रामदेव हे सोशल मीडियाबरोबरच टीव्हीवरील नामांकित व्यक्तीमत्वांपैकी एक आहेत. आरोग्यविषयक सल्ल्यांबरोबरच आयुर्वेदिक उपचारांचा प्रसार करण्यासाठी ते ओळखले जातात. पतंजली प्रोडक्टबरोबर दैनंदिन आयुष्यामध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर वाढवण्याचा प्रचार बाबा रामदेव करतात. बाबा रामदेव यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंमध्ये आहे. योग अभ्यास आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी बाबा रामदेव हे भारताबरोबरच जगभरात प्रसिद्ध आहेत. 


वादात अडकले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबा रामदेव यांनी कोरोनावरील उपाचाराबद्दल केलेल्या विधानावरुन ते वादात अडकले होते. कोरोनावरील लसींऐवजी आपल्या कंपनीचे प्रोडक्ट पर्यायी उपचार म्हणून विकल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून ही याचिका सध्या न्यायप्रविष्ठ आहे. बाबा रामदेव यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. असं असतानाच आता बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव चक्क गाढविणीचं दूध काढताना दिसत आहेत. बाबा रामदेव हे गाढवाच्या दुधाचे फायदे या व्हिडीओत सांगत आहेत.


गाढविणीच्या दुधाचे फायदे सांगितले


सामान्यपणे लोक गायी किंवा म्हशीचं दूध पितात. अगदीच काही ठिकाणी शेळीच्या दुधाचंही सेवन केलं जातं. मात्र बाबा रामदेव यांनी गाढवाचं दुधही फायद्याचं असल्याचा दावा या व्हिडीओत केला आहे. मात्र गाढवाचं दूध अधिक पौष्टीक आणि लाभदायक असतं हे यापूर्वीही अनेकदा सांगण्यात आलं आहे. बाबा रामदेव यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये आधी ते गाढवाचं दूध काढताना दिसत आहेत. त्यानंतर ते, "मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच गाढवाचं दूध काढलं. मी यापूर्वी उंट, गाय, शेळीचं दूध काढलं आहे. हे (गाढवाचं) दूध म्हणजे सुपर टॉनिक आहे. ते फार उपयुक्त असतं," असं सांगताना दिसतं. गाढवाचं दूध हे आरोग्याबरोबरच सौंदर्य प्रसादनासारखंही वापरता येतं असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.


ती गाढविणीच्या दुधानेच अंघोळ करायची


बाबा रामदेव यांनी गाढवाचं दूध फारच चविष्ट असल्याचा दावा करताना आपण क्विचितच या दुधाचं सेवन करतो असंही सांगितलं. आपण गाय, उंट, शेळीचं दूध पितो असं बाबा रामदेव म्हणाले. बाबा रामदेव यांनी गाढवाच्या दुधाचं महत्त्व सांगताना, "क्लिओपात्रा (इजिप्तची राणी) या (गाढवाच्या) दुधाने अंघोळ करायची (कारण याचे सौंदर्यवर्धक फायदे आहेत)," असाही दावा केला. 



गाढविणीच्या दुधाचा दर ऐकून बसेल धक्का


दुधाची अॅलर्जी असलेल्यांनाही गाढवाचं दूध सेवन करता येतं असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. गायीचं दूध हे 65 रुपये लिटर दराने विकलं जात असतानाच गाढवाचं दूध मात्र 5 हजार रुपये ते 7 हजार रुपये लिटर दराने विकलं जातं. मात्र अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गाढवाच्या दुधाचं सेवन करावं असा सल्ला देतात.