झोपेच्या समस्या असतील तर सावधान व्हा; झोपेच्या विकारांचा मेंदूच्या आरोग्यावर होतोय परिणाम
Brain Health: पुरेशी झोप न मिळाल्याने तुमच्या पुढील संपूर्ण दिवसावर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे चिडचिड होणे, तणाव , नैराश्याची भावना निर्माण होते. अपुऱ्या झोपेमुळे संबंधीत व्यक्तीच्या भावना, संवेदना, हालचाली आणि स्मरणशक्तीसारख्या महत्त्वपूर्ण कार्यात अडथळे निर्माण होतात.
Brain Health: झोपेचे विकार मेंदूच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात, विशेषत: पार्किन्सन्स रोग, स्मृतिभ्रंश, अल्झायमर रोग आणि स्ट्रोक सारख्या परिस्थिती असलेल्या व्यक्तींमध्ये. जाणून घ्या या गंभीर परिस्थितींमुळे मेंदूच्या कार्यात कसा अडथळा येतो.
मुंबईतील न्यूरो सर्जन डॉ. डॉ. विश्वनाथन अय्यर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीप डिसऑर्डर ही एक गंभीर स्थिती आहे जी व्यक्तींना दीर्घकाळ शांत झोप घेणे आव्हानात्मक ठरते. हे तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम करू शकते आणि तुमच्या दैनंदिन कार्यात व्यत्यय आणू शकते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगभरात 80 पेक्षा जास्त प्रकारचे झोपेचे विकार आहेत. स्लीप एपनिया, रेस्टलेस लेग सिंड्रोम (RLS), नार्कोलेप्सी, निद्रानाश, हायपरसोम्निया, पॅरासोम्निया, सर्केडियन रिदम डिसऑर्डर आणि रॅपिड आय मूव्हमेंट (REM) स्लीप डिसऑर्डर हे काही ठराविक झोपेचे विकार आहेत.
पुरेशी झोप न मिळाल्याने तुमच्या पुढील संपूर्ण दिवसावर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे चिडचिड होणे, तणाव , नैराश्याची भावना निर्माण होते. अपुऱ्या झोपेमुळे संबंधीत व्यक्तीच्या भावना, संवेदना, हालचाली आणि स्मरणशक्तीसारख्या महत्त्वपूर्ण कार्यात अडथळे निर्माण होतात. तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो ज्यामुळे गोंधळ उडणे, निर्णय घेता न येणे आणि गोष्टी लक्षात न राहणे यासारखे परिणाम दिसून येतात. तुमचे मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी किमान 7 ते 8 तासांची शांत झोप घेणे गरजेचे आहे, असंही डॉ. विश्वनाथन अय्यर यांनी म्हटलं आहे.
खालील आजार हे तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर परिणाम करतात
स्मृतिभ्रंश
स्मृतिभ्रंश म्हणजे केवळ स्मृती किंवा आठवणी विसरणे नसते, तर आठवणींशिवाय आपली विचार करण्याची शक्ती, निर्णयक्षमता, शारीरिक हालचालींवर नियंत्रण अशा अनेकविध क्षमतांवर होणारा परिणाम असतो. हे मेंदूतील निरोगी चेतापेशींना कार्यक्षमतेने काम करण्यापासून परावृत्त करते. पुढे मेंदूच्या इतर पेशींशी संपर्क तुटल्यामुळे या पेशी मृत पावतात. यामुळे वयानुसार नेहमीपेक्षा लवकर न्यूरॉन्स कमी होतात.
अल्झायमर रोग
यामुळे बीटा-अमायलोइड प्लेक्स नावाच्या असामान्य प्रथिने जमा होण्यास सुरुवात होते. अल्झायमर हा एक मेंदूचा विकार आहे. जो स्मृती, विचार आणि वर्तन प्रभावित करतो. हा स्मृतिभ्रंशाचा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि सामान्यतः वृद्धांना प्रभावित करतो. अल्झायमर हा रोग वेगवेगळ्या टप्प्यांतून आढळून येतो. अल्झायमर रोगामुळे मेंदूतील न्यूरॉन्सचे नुकसान होऊ शकते. हे बदल तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. जसं की, स्मरणशक्ती कमी होणे, वर्तणुकीत वारंवार बदल होणे, विसर पडणे आणि तणावपूर्ण परिस्थितीत त्वरित निर्णय न घेता येणे यासारख्या समस्या वाढू शकतात.
पार्किन्सन रोग
हा एक प्रकारचा मेंदू विकार आहे जो तुमच्या हालचालींवर परिणाम करतो. पार्किन्सन रोग उद्भवतो जेव्हा तुमच्या मेंदूतील काही मज्जातंतू पेशी अचानक काम करणे बंद करतात परिणामी डोपामाइन नावाचे रसायन पुरेसे तयार होत नाही. डोपामाइन हा एक रासायनिक संदेशवाहक आहे जो भावनांचे नियमन करण्यासाठी आणि हालचालींसाठी स्नायूंमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी जबाबदार आहे. एखाद्याला थरथरणे, संतुलन राखण्यासाठी संघर्ष करणे, संज्ञानात्मक समस्या, नैराश्य आणि भावनिक अस्वस्थता यासारख्या समस्या येऊ शकतात.
स्ट्रोक
यामध्ये मेंदूच्या पेशींचे नुकसान होते ज्यामुळे मेंदूच्या कार्यात अडथळे येतात परिणामी कायमचे नुकसान होऊ शकते. रक्त मेंदूपर्यंत पोहोचलं नाही तर मेंदूला रक्ताद्वारे ऑक्सिजन आणि पोषक तत्वं मिळत नाहीत. ऑक्सिजन आणि पोषक तत्वांच्या अभावामुळं मेंदूच्या पेशींचा काही मिनिटांत मृत्यू होऊ लागतो. प्लाक म्हणून ओळखला जाणारा फॅटसारखा पदार्थ रक्त वाहिन्यांमध्ये साचल्यामुळंही रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो.