मुंबई : महाराष्ट्रभरात उन्हाचा पारा चाळीशीपलिकडे जात असल्याने डीहायड्रेशन, पित्त, उष्माघात असे त्रास वाढत आहेत. अशावेळी शरीराला थंडावा मिळावा म्हणून एसीत राहणं, विकतची सॉफ्ट ड्रिंक्स पिणं अशा गोष्टींची मदत घेतली जाते. मात्र हे पर्याय खर्चिक आणि कालांतराने शरीराला अपायकारक ठरतात. म्हणूनच यंदाच्या उन्हाळ्यात थंडगार राहण्यासाठी काही आयुर्वेदिक आणि नैसर्गिक मार्गाचा वापर करून पहा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी हमखास फायदेशीर ठरणारी एक वनस्पती म्हणजे ‘वाळा’.सुकलेल्या गवताप्रमाणे दिसणारा वाळा उन्हाळ्यात फारच उपयुक्त ठरतो. मग या आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर करून उन्हाळा कसा सुसह्य होऊ शकतो याबाबत आयुर्वेदीक वैद्य डॉ. परीक्षित शेवडे ( आयुर्वेद MD) यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या.


डॉ. शेवडे यांच्या सल्ल्यानुसार, वाळा ही एकमेव अशी वनस्पती आहे. जी थंड स्वरूपाची असली तरीही उन्हाळ्यात मंदावलेल्या पचनशक्तीला चालना देण्यासाठी मदत करते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात ‘कूल’ राहण्यासाठी विविध स्वरूपात वाळ्याचा समावेश करता येतो.


1) पाण्याच्या भांड्यात वाळा घाला –


उन्हाळ्यात फ्रीजचं पाणी पिणं हा उपाय तात्पुरता फायदेशीर वाटत असला तरीही आरोग्यासाठी अशाप्रकारचे पाणी पिणं त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच फ्रीजऐवजी माठात पाणी भरून ते प्यावे. माठांत किंवा इतर भांड्यात पाणी भरून ठेवले असेल तर ते नैसर्गिकरित्या थंड करण्यासाठी त्यामध्ये वाळ्याची जुडी घालून ठेवा.


मात्र पाण्यात वाळा घालून ठेवण्यापूर्वी त्याला बांधलेली साधी दोरी कापून केवळ वाळा पाण्यात मिसळा. साधा दोरा फार काळ पाण्यात राहिल्यास त्यावर बॅक्टेरिया वाढण्याची  शक्यता असते. पण वाळा पाण्यात सडत नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून दर 15 दिवसांनी वाळा पाण्यातून काढून उन्हात वाळवून पुन्हा वापरू शकता. अशाप्रकारे एक वाळ्याची जुडी सुमारे महिना, दीड महिना वापरणे अगदीच सुरक्षित आहे. 


2) वाळ्याचा लेप


उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात पित्त वाढण्याची शक्यता दाट असते. अशावेळेस शरीरावर चंदनाची उटी किंवा वाळ्याचा लेप लावणं फायदेशीर ठरते. त्यामुळे शरीरात थंडावा राहण्यास मदत होते.


3) वाळ्याचं सरबत


उन्हाळ्याच्या दिवसात सतत घाम येत असल्याने शरीरातील क्षार आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. अशावेळी सतत लागणारी तहान शमवण्यासाठी वाळ्याचं सरबत फायदेशीर ठरतं. यामुळे उन्हाचा त्रास कमी होतो तसेच शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते. वाळ्याचं सरबत किंवा वाळ्याचं चूर्ण पाण्यात मिसळून ते सकाळी नाश्त्यानंतर प्यायल्यास उन्हाळ्याच्या दिवसात ते एनर्जी ड्रिंकप्रमाणे कमाल करू शकते.मंदावलेली पचनशक्ती  सुधारून, उन्हाळ्याच्या दिवसातील मरगळ झटकण्यास मदत होते. 


4) वाळ्याच्या टोप्या


तीव्र सूर्यकिरणांचा त्रास झाल्यास हीटस्ट्रोक / उष्माघाताचा त्रास होतो. अशावेळेस उन्हांत कामानिमित्त बाहेर पडणार असाल तर वाळ्याच्या टोप्या घालून बाहेर पडणं अधिक सुरक्षित ठरेल.


5) वाळ्याचे पडदे / पंखे  


वाळ्याचे पडदे आणि पंखे हे उन्हाळ्यात नैसर्गिक स्वरूपातील एअर  कंडिशनप्रमाणे काम करतात. प्रामुख्याने विदर्भात उन्हाळ्याच्या दिवसात वाळ्याचे पडदे किंवा पंखे वापरले जातात. त्यावर पाणी मारल्यानंतर पड्द्यांना छेदून येणारी हवा थंडगार असते. त्यामुळे उन्हाळ्यात घरात थंडावा निर्माण करणारा हा इको फ्रेंडली पर्यायही नक्की आजमावून पहा.