कोरोना लसीचे 2 डोस घेऊनही ब्रेकथ्रू इन्फेक्शन थांबेना!
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशात लसीकरण मोहीमेला सुरूवात करण्यात आली आहे.
मुंबई : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशात लसीकरण मोहीमेला सुरूवात करण्यात आली आहे. देशभरातील अनेक नागरिकांनी लसीचे डोसंही घेतले आहे. मात्र लसीचे डोस घेऊन देखील कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार, देशात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊनही 80 हजार ब्रेकथ्रू इन्फेक्शनची प्रकरणं समोर आली आहेत.
ब्रेकथ्रू इन्फेक्शनची प्रकरणं मोठ्या प्रमाणात समोर आल्यामुळे आता आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आतापर्यंत देशात 87 हजाराहून अधिक लोकांना दोन कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊनही कोरोना झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. चिंतेची बाब म्हणजे यातील 46 टक्के रुग्ण हे एकट्या केरळमधील आहेत. तर 54 टक्के रुग्ण देशातील इतर भागातील आहेत.
सध्या, केरळमधून ब्रेकथ्रू इन्फेक्शनच्या 200 नमुन्यांचं जीनोम सिक्वन्सिंग केलं गेलं आहे. परंतु आतापर्यंत कोणतेही नवीन वेरिएंट किंवा प्रकार समोर आले नाहीत. केरळच्या वायनाडमध्ये तर 100 टक्के लसीकरण झालं असूनही त्या ठिकाणी ब्रेकथ्रू इन्फेक्शनची प्रकरणं समोर आली आहेत.
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने याबाबत डेटा जाहीर केला होता. केंद्र सरकारने 3 ऑगस्ट 2021 पर्यंतचा डेटा सांगितला होता. यानुसार कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही 2.6 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती सरकारच्या एजसिंनी गोळा केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, यामधील 1.71 लाख लोकांना कोरोनाची लागण ही लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर झाली. तर दुसरीकडे दोन्ही डोस घेतल्यानंतर एकूण 87,049 लोकांना संसर्ग झाला आहे. यामुळे स्पष्ट होतं की, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणारे एक लस घेण्यापेक्षा सुरक्षित आहेत.