लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढवतात ही ५ छुपी कारणं
या सवयी टाळाच
मुंबई : मूल लहान असते तेव्हा त्याचे गुबगुबीत गाल क्युट वाटतात. पण हळूहळू जशी मुलं वाढतात तसा त्यांच्या शरीराचाही आकार वाढणं, वय आणि उंचीच्या अपेक्षेपेक्षा वजन जास्त असणं त्रासदायक ठरू शकते. आजकाल लहान मुलांमध्येही लठ्ठपणाकही समस्या सर्रास आढळते.
जंक फूड खाणं, खूप वेळ एकाच जागी बसून राहणे, तासन तास टीव्ही पाहणं ही लठ्ठपणा वाढण्याची कारणं आपण जाणतोच पण काही हमखास दुर्लक्षित केल्या जाणार्या सवयीदेखील लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढवतात. म्हणूनच डॉ. रमण गोयल यांनी सांगितलेली ही कारण मूळीच दुर्लक्षित करू नका.
रात्री उशिरा झोपणं - 'लवकर नीजे लवकर उठे' हा नियम आपल्याला वर्षानुवर्ष सांगितला आहे. पण आजकालच्या जीवनशैलीमुळे अनेकजण रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. मुलांना झोपायला जितका उशीर होईल तितका त्यांच्या वजनाचा बीएमआय वाढेल.
नाश्ता टाळणं - सकाळी उठायला उशीर झाला की घाईगडबीत तुम्ही मुलांना नाश्ता न करताच शाळेत पाठवता का ? जर तुमचं उत्तर हो असेल तर या चूकीच्या सवयीमुळे मुलांचा लठ्ठपणा वाढत आहे. नाश्ता टाळण्याच्या सवयीचा मुलांच्या भूकेवर परिणाम होतो. हळूहळू ते अधिक कॅलरी, एनर्जी देणारे पदार्थ खायला लागतात.
अपुरी झोप - रात्रभर जागून अभ्यास करण्याची सवय मुलांना भविष्यात त्रासदायक ठरू शकते. मुलांच्या वाढत्या वयासोबत पुरेशी झोप मिळणं गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्या झोपेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
गोडाचे खाणे - लहान मुलांमध्ये एनर्जी अधिक असते म्हणून त्यांना सतत गोडाचे खायला देणे कालांतराने त्रासदायक ठरू शकते. साखरेचे गोड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, ब्रेव्हरेजेस अति प्रमाणात प्यायल्यास शरीराला त्रास होतो. त्यांचे वजन वाढते.
स्मार्टफोनचे व्यसन - आजकाल मुलांनाच स्मार्टफोन अधिक चांगल्या प्रकारे हाताळता येतो. पण सतत स्मार्टफोन मुलांच्या हातात दिल्याने त्यांच्या मेटॅबॉलिक रेटवर परिणाम होतो. तो खालावल्याने मुलांमधील लठ्ठपणा वाढत आहे.