देहविक्रीत अवेळी तारूण्यात ढकलण्यासाठी लहान मुलींवर जबरदस्तीने हार्मोन्सचा मारा
आठ ते दहा हे तसं तर हसण्या, खेळण्याचं, बागडण्याचं, नवं काही शिकण्याचं वय आहे.
मुंबई : आठ ते दहा हे तसं तर हसण्या, खेळण्याचं, बागडण्याचं, नवं काही शिकण्याचं वय आहे. मात्र नेपाळच्या काही मुलींच्या वाटेला या वयामध्ये काही भयंकर गोष्टींचा सामना करावा लागत आहे. सेक्स व्यापारमध्ये कोवळ्या मुलींचा समावेश करण्यासाठी त्यांच्यावर हार्मोन इंजेक्शनचा मारा केला जात आहे.
देह व्यापारासाठी मुली भोगतात या यातना
देहव्यापारासाठी वापरण्यात आलेल्या मुलींना कोवळ्या वयात चांगलं शिक्षण देण्याचं आमिष दाखवून नेपाळमधून भारतामध्ये आणलं जातं. त्यानंतर जबरदस्तीने त्यांना एका विशिष्ट प्रकारचे औषध दिले जाते. या औषधामुळे मुलींना उलट्यांचा त्रास होतो. नकोसं वाटणारं औषध जबरदस्तीने दिले जात असल्याचे मुलींना सांगितले आहे. औषध प्यायल्यानंतर तू लवकर मोठी होशील आणि लवकर घरी जाशील असं आश्वासन देऊन मुलींवर हार्मोन्स इंजेक्शनचा मारा केला जात असे.
भारत - नेपाळ सीमेवर होतेय मानवी तस्करी
मानवी तस्करीची वाढती प्रकरणं पाहून भारत - नेपाळ सीमेवर खास चौक्या उभारण्यात आल्या आहेत. तस्करी करताना प्रामुख्याने गरीब घरातील लहान मुलींचा वापर केला जातो. तरूण मुलींची ओळख तात्काळ पटवली जाऊ शकते.
आरोग्यावर गंभीर परिणाम
लहान वयात मुलींवर ग्रोथ हार्मोन्सचा मारा केल्याने त्यांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात. मागील चार वर्षातच तस्करीचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये तक्रारींचे प्रमाण 181 वरून 268 इतके झाले आहे. तक्रारी करणार्यांमध्ये 80% महिलांचा समावेश आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसआर, साधारण 9-12 या वयातील मुलींना हार्मोन इंजेक्शन दिले जाते. परिणामी मुलींच्या शरीरात स्तनाची, नितंबाची वाढ अधिक झपाट्याने होते. हार्मोनमुळे मुलींचे शरीर अधिक लवकर तरूण होते. मात्र यामुळे त्यांच्या हाडांवर, गर्भाशयावर परिणाम होतो.
अनेकदा युरोप किंवा अमेरिकेमध्ये नागरिकत्व मिळवून देण्याचं, नोकरीचंही आमिष दाखवले जाते. या प्रकरणामध्ये समाजात वेळीच जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आलं आहे.