मुंबई : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात आलाय. मात्र या लाटेपूर्वीच एक चांगली बातमी समोर आली आहे. लवकरच देशात लहान मुलांचं लसीकरण सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानुसार, सप्टेंबर महिन्यात किंवा त्यांनंतर लगेच लहान मुलांचं लसीकरण सुरु होऊ शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ICMR-NIVच्या संचालिका प्रिया अब्राहम यांनी लहान मुलांचं लसीकरण सुरु करण्याबाबत संकेत दिलेत. लहान मुलांवर लसीच्या चाचण्या झाल्या असून चाचण्यांचे रिझल्ट समोर येतील. त्यानंतर ते DCGIकडे याचा डेटा पाठवण्यात येईल आणि मुलांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेतला जाईल, असं प्रिया अब्राहम म्हणाल्या आहेत.


दुसरीकडे भारतातही लशीचा तिसरा डोस घ्यावा लागू शकतो. काही देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस दिला जातोय. भारतातही अशा शिफारसी येऊ लागल्याचं, प्रिया अब्राहम यांनी स्पष्ट केलंय. भविष्यात बुस्टर डोसची गरज भासू शकते. त्याचप्रमाणे मिक्स अँड मॅच लसी सुरक्षित असल्याचंही अब्राहम यांचं म्हणणं आहे. सीरमचे संचालक सायरस पुनावाला यांनीही पुण्यातील कार्यक्रमत बुस्टर डोसची गरज असल्याचं म्हटलं होतं. 


दुसरीकडे देशभरात लसीकरण मोहीमेला वेग देण्यात येतोय. मात्र मुंबईत आज आणि उद्या लसीकरण बंद असणार आहे. महापालिकेकडील लशींचा साठा संपल्यामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आलंय. त्यामुळे आता नागरिकांना लसीकरणासाठी थेट शनिवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 


गेल्याच आठवड्यात लसींचा साठा संपल्यामुळे महापालिकेला दोन दिवस लसीकरण बंद ठेवावं लागलं होतं. आज पुन्हा तीच वेळ महापालिकेवर आली. आज रात्रीपर्यंत लशींचा साठा येणार असल्याची माहिती आहे. जर आज हा साठा आला तर शुक्रवारी दिवसभरात केंद्रांवर वितरित करण्यात येईल. त्यामुळे लसीकरण शनिवारी सुरू होण्याची शक्यता आहे