पुणे : सध्याच्या सतत बदलत्या वातावरणामुळे अनेक लोकांना सांधेदुखीची समस्या जाणवू लागली आहे. विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सांधेदुखीच्या प्रकरणात ५० टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येते. दरम्यान सदयस्थितीत या दुखण्याच्या रूग्णसंख्येत दुपट्टीने वाढ होत असून ६०-६५ वयोगटातील वृद्धांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं डॉक्टरांनी म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैद्यकीय भाषेत सांधेदुखीला ऑस्टिओआर्थरायटीस म्हणून संबोधले जाते. सांध्यांमध्ये कार्टिलेज नावाचा घटक असतो. या कार्टिलेजमुळे सांध्यांची हालचाल योग्यरीत्या होत असते. कोणत्याही कारणास्तव कार्टिलेजची झीज झाली असता सांधेदुखी वाढते व या वेदना असह्य होतात. सांध्यांमधील हाडे एकमेकांना घासली जातात त्यामुळे गुडघ्यामध्ये सूज येऊ लागते. अनुवंशिकता, वाढलेले वजन, व्यायामाची कमतरता, अपुरे पोषण यामुळेही गुडघेदुखीची समस्या उद्भवते.


तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या अनिश्चित वेळा यामुळे सांधेदुखीची समस्या होऊ शकते. बऱ्याचदा सांधेदुखी ही अनुवांशिक असू शकते. त्यासाठी काही आरोग्यपूर्ण गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. या गोष्टी पाळल्या, तर या ऋतूंमध्ये होणारा सांधेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. सर्वसाधारणपणे सांधेदुखीची लक्षणे ६० ते ६५ वर्षे वयोगटातील वृद्धांमध्ये दिसून येते. थंड हवामानात सांध्यामधील वेदना, ताठरपणा आणि सूज वाढते. या आजारासाठी कोणताही कायमस्वरूपी उपचार नसल्याने अनेक आरोग्यतज्ज्ञ सांधेदुखीपासून आराम मिळावायासाठी योग्य आणि पोषक आहारावर भर देण्याचा सल्ला देतात.



अपोलो क्लिनिक पुणे येथील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मयंक पाठक सांगतात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांमध्ये उतावयातील रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. पावसाळा सुरू होताच अशा रुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी वाढली आहे.


सतत सूज येणे व लालसरपणा, चालताना त्रास होणे, प्रचंड प्रमाणात होणारी गुडघेदुखी तसेच इतर समस्या जाणवल्यास अस्थिविकार तज्ञांचा सल्ला घेणे उत्तम ठरेल. आपणास सातत्याने किंवा तीव्र वेदना होत असल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.


गुडघ्याच्या सांध्याचे नुकसान किंवा दुखापत टाळण्यासाठी कोणताही व्यायामप्रकार सुरू करण्यासाठी पुरेसे वॉर्म-अप करणे आणि स्ट्रेचिंग करणे महत्त्वाचे आहे. तत्काळ वेदनामुक्तीसाठी तुम्ही हीट पॅक्स वापरू शकता पण शरीराचा तो भाग भाजणार नाही यासाठी काळजी घेतली पाहिजे. हे उपाय दिवसातून काही वेळा केले जाऊ शकतात.


गरम पाण्याने आंघोळ करा आणि काही मूलभूत तंत्रे वापरून मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूतील ताठरपणा कमी होऊन हालचाल करणे सोपे होते. लक्षात घेण्याजोगी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीराला काही मर्यादा आहेत; त्यामुळे पुरेशी विश्रांती नक्की घ्या.


तुम्ही गुडघ्याच्या सांध्यावर एका वेळी खूप ताण येऊ देऊ नका. सांध्यांना पुरेशी विश्रांती द्या. “उबदार राहा, व्यायामाद्वारे स्नायू आणि हाडांची ताकद वाढवा. हे आपल्या सांध्यावरील दबाव कमी करते, म्हणूनच त्यांना दुखापत होण्याची शक्यता कमी असते.


आपल्या सांध्यावरील ताण कमी करण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवा,  दैनंदिन कामकाजादरम्यान आपल्या सांध्यावर येणारा अनावश्यक ताण टाळा. शरीर सक्रिय राहिल्यास आपले स्नायू आणि सांधे निरोगी राहतात. रात्रीची पुरेशी झोप घ्या,  निरोगी आहार घ्या आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,  असे डॉ. पाठक यांनी सांगितले.