जपानमध्ये अडकलेल्या दोघा भारतीयांना कोरोनाची लागण
चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोना वायरसची जगभरात दहशत
मुंबई : जपानमध्ये डायमंड क्रूझ या जहाजावर अडकलेल्या दोघा भारतीयांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालंय. या जहाजावर साधारणपणे दीडशे लोक अडकून पडलेत. त्यामध्ये काही भारतीय आहेत. गेल्या आठवड्यात या जहाजावरील एका प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षण आढळल्यानंतर हे जहाज समुद्रातच थांबवण्यात आलं असून कोरोनाच्या रुग्णांनाही वेगळं ठेऊन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आलेत.
चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोना वायरसची जगभरात दहशत पसरली आहे. या वायरसने अनेक बळी घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे-दिल्ली विमानात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला आहे. सध्या पुण्यातील नायडू रुग्णालयात या रुग्णावर तपास आणि उपचार सुरु आहेत.
चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान पहायला मिळतंय. कोरोनामुळे आत्तापर्यंत दीड हजारांहून अधिक जणांचा बळी गेलाय. एकट्या हुबई प्रांतात एका दिवसांत तब्बल २४२जणांचा मृत्यू झालाय. या आकडेवारीवरूनच कोरोना व्हायरसची गंभीरता लक्षात येतेय.
त्याचप्रमाणे सध्या चिकनमुळे कोरोना होत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर सध्याच्या वैज्ञानिक संशोधनात असे दिसून येत आहे की, हा विषाणू अजूनही चीनमध्ये एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे पसरत आहे. पण चिकनमध्ये अद्याप विषाणूचा संसर्ग आढळलेला नाही. त्यामुळे चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हटलं आहे.