मार्च-जूनपेक्षा जुलैमध्ये कोरोनाची भयावह स्थिती, मृत्यूंची नोंद अधिक
भारतातील कोविड-19 लसीकरणाचा आकडा 205 कोटींहून अधिकपर्यंत पोहोचला आहे. मात्र तरीही कोरोनाची प्रकरणं थांबताना दिसत नाहीयेत.
मुंबई : भारतातील कोविड-19 लसीकरणाचा आकडा 205 कोटींहून अधिकपर्यंत पोहोचला आहे. मात्र तरीही कोरोनाची प्रकरणं थांबताना दिसत नाहीयेत. जुलैमध्ये गेल्या दोन महिन्यांत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू आणि रुग्णांची नोंद झालीये.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये भारतात कोविड-19 ची 5.67 लाख प्रकरणं नोंदवली गेली आणि 1,241 मृत्यू झाले. जुलैमधील मृत्यूंची संख्या मे आणि जूनमध्ये एकत्रितपणे झालेल्या मृत्यूंइतकीच होती. जिथे मे महिन्यात कोरोनामुळे 827 मृत्यू झाले होते, जे जूनमध्ये 486 पर्यंत कमी झाले.
या वर्षाची सुरुवात भारतात कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या उद्रेकाने झाली. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मृत्यूची संख्या 10,000 पेक्षा जास्त होती. मार्चमध्ये, मृत्यूची संख्या कमी होऊ लागली आणि हा आकडा 7,300 वर पोहोचला. तर एप्रिलमध्ये ही संख्या घटून 2,674 वर आली.
जानेवारीमध्ये कोरोनाचे दर महिन्याला रुग्ण 64 लाखांहून अधिक होते. फेब्रुवारीमध्ये हा आकडा 16.21 लाखांवर आला आणि मार्चमध्ये तो एक लाखापेक्षा कमी झाला. त्याच वेळी, एप्रिल आणि मे महिन्यात देशात कोरोनाचे एक लाखांहून कमी रुग्ण आढळले आहेत.
जूनमध्ये प्रकरणं तीन लाखांच्या जवळपास पोहोचली. शुक्रवारी, भारतात कोरोनाची 20,551 प्रकरणं नोंदली गेली आणि 70 लोकांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 5.26 लाख मृत्यू आणि कोविड-19 चे 4.41 कोटी रुग्ण आढळले आहेत. तर 1.35 लाख एक्टिव्ह प्रकरणं आहेत.