Corona Vaccine: बूस्टर डोस देण्यासाठी लसीला अपग्रेड करण्याची गरज?
जागतिक आरोग्य संस्थेच्या तज्ज्ञांच्या मतानुसार, कोरोना लसीला अपग्रेड करण्याची गरज आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रभावी लस तयार करावी लागेल.
मुंबई : कोरोनाच्या विविध व्हेरिएंटमुळे लोकं चिंतेत आहेत. मात्र कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु आहे. तर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना आता बूस्टर डोस देण्यात येतोय. मात्र, दोन्ही डोसमध्ये देण्यात आलेली लसच बूस्टर डोसमध्ये दिली जातेय.
जागतिक आरोग्य संस्थेच्या तज्ज्ञांच्या मतानुसार, कोरोना लसीला अपग्रेड करण्याची गरज आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रभावी लस तयार करावी लागेल. तरच भविष्यात कोरोनाचा प्रभाव रोखता येण्यास मदत होणार आहे. असे केल्याने, गंभीर आजार आणि मृत्यूचा प्रतिबंध आणखी चांगल्या प्रकारे होईल.
नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या क्रिटिकल केअर विभागातील डॉक्टरांनी सांगितलं की, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट लक्षात घेता लसीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. कारण लोकांनी जुनी लस पूर्वीच घेतली आहे. त्यामुळे या लसीचा पुन्हा बूस्टर डोस म्हणून देण्यात काही फायदा होणार नाही. जुन्या लसीमुळे मृत्यूच्या घटनांमध्ये घट झाली आहे, परंतु ती संसर्ग रोखण्यासाठी संरक्षण देण्यासाठी सक्षम नाही.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, आम्हाला भविष्यात लस नवीन पद्धतीने अपग्रेड करणं आवश्यक आहे. जेणेकरून ही अपग्रेड केलेली लस नवीन व्हेरिएंटशी लढा देऊ शकेल. त्यामुळे संसर्गाची नवीन प्रकरणं कमी होतील आणि मृत्यूदरातही मोठी घट दिसून येईल.