मुंबई : कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाहीये. युरोप आणि आशियाई देशांमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. याचा प्रभाव भारतावरही झालेला दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत रूग्णांचं प्रमाण वाढतंय. यावेळी दिल्ली एनसीआरमधील शाळेच्या काही मुलांना कोरोनाची लागण झाली. आता तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, यावेळी कोरोनाचा परिणाम लहान मुलांवर दिसून येतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या नवीन XE व्हेरिएंटची लहान मुलांना झपाट्याने लागण होत असल्याचं दिसून येतंय. तज्ज्ञांनी म्हटलं की, लहान मुलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून येतायत. जर यावर वेळीच उपचार केले तर प्रकृती सुधारू शकते. यावेळी पालकांनी घाबरून न जाता मुलांमध्ये दिसणारी लक्षणं ओळखावीत.


मुलांमध्ये दिसणारं पहिलं लक्षण अतिसार किंवा ओटीपोटात दुखणे असू शकतं. याशिवाय इतर लक्षणांमध्ये ताप, घसा खवखवणं, कोरडा खोकला, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणं, नाक वाहणं, थंडी वाजणं, डोकेदुखी, उलट्या आणि जुलाब यांचा समावेश आहे. 


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, पालकांनी त्यांच्या मुलांनी निरोगी जीवनशैली राखणं, चांगलं खाणं, झोपणं, स्वच्छतेचं पालन करणं या सवयींकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे लसीकरणास पात्र असलेल्या मुलांचं लवकरात लवकर लसीकरण केलं पाहिजे.