मुंबई : लाँग-कोविडमुळे (long-covid) मुलांना त्रास होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत या विषाणूचा संसर्ग केवळ प्रौढ किंवा ज्येष्ठ नागरिकच नाही तर मुलांनाही होऊ लागला आहे. सध्या कोरोनाची जागतिक साथ सुरू असताना सर्व पालकांच्या मनात आपल्या मुलांना कोरोना झाला तर काय, अशी चिंता सतावतेय. याशिवाय लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने कोणत्याही संसर्गजन्य व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्यांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे या विषाणूची लागण होण्यापासून लहान मुलांना कसे वाचवावे, असा प्रश्न पालकांच्या मनात येत आहे. (COVID-19: How to protect children from the covid infection?) त्यासाठी डॉक्टरांना काय करावे, हे सांगितले आहे. पुणेमधील खराडी येथील मदरहूड रूग्णालयाचे सल्लागार, नियोनेटोलॉजिस्ट आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. तुषार पारीख (Dr. Tushar Parikh) यांनी याबाबत काय काळजी घ्यावी, याबाबत सल्ला दिला आहे. 


अशी घ्या आपल्या मुलांची काळजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड-19 हा श्वसनाशी संबंधित विकार आहे. कोरोनाच्या या विषाणूचं शास्त्रीय नाव आहे SARS Cov-2. या कोरोना विषाणूमुळे कुटुंबियांसह लहान मुलांचे जगणं अवघड होऊन बसले आहे. बर्‍याच पालकांमध्ये या आजाराबद्दल आणि मुलांवर काय परिणाम होईल याबद्दल गैरसमज आहेत. त्यामुळे, कोरोनाची लागण होण्यापासून आपल्या मुलांचे संरक्षण कसे करावे याबद्दल तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करत आहेत.


1)  मुलांमध्ये कोविड-19 ची कोणती लक्षणे दिसून येतात?
ताप,  खोकला,  श्वास लागणे,  थकवा,  घसा खवखवणे,  अतिसार,  गंध कमी होणे,  चव कमी होणे, जठरासंबंधी आजाराची लक्षणे, मळमळ,  उलट्या होणे,  डोकेदुखी,  कोरडा खोकला आणि स्नायू दुखणे यांसारखी लक्षणे लहान मुलांमध्ये आढळून येतात. मुलांमध्ये ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.


2) लाँग-कोविडमुळे मुलांना त्रास होऊ शकतो?
लहान मुलांमध्ये कोविड-19 संसर्ग झाल्यास साधारणतः या आजाराची लक्षणे आठवडाभर किंवा महिनाभर सुद्धा दिसून येतात. संशोधनानुसार, कोणतीही दीर्घकालीन वैद्यकीय परिस्थिती नसलेली मुले किंवा गंभीर कोविड-19 संसर्गात ज्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आलेली आहेत, अशा लहान मुलांना कोरोनातून बरे झाल्यानंतर विविध आजारांचा त्रास होत आहे. 


जसे की, स्नायू दुखणे, अशक्तपणा, वास आणि चव कमी होणे, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि थकवा मुलांमध्ये दिसून येतो. लाँग कोविड असलेल्या मुलांची संख्या अद्याप माहित नाही, परंतु मुलांमध्ये लक्षणांमध्ये थकवा, घसा खवखवणे, डोकेदुखी आणि स्नायू दुखणे आणि अशक्तपणा यांचा समावेश असू शकतो. याशिवाय कोरोनातून ठिक झाल्यानंतर अनेक लहान मुलांना तीन ते चार आठवड्यानंतर मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम (एमआयएस-सी) हा आजार होऊ शकतो.


3) कोविड संक्रमणापासून मुलांना कसे संरक्षण करावे?
आपल्या मुलांना कमी वेंटिलेशनसह गर्दीच्या मर्यादित आणि बंद जागांवर घेऊ नका. आपल्या मुलांना घराबाहेर जाताना मास्क लावायला सांगा आणि वारंवार हात स्वच्छ धुवा. फरशी, दरवाजा, हँडल्स आणि नळ यासारख्या पृष्ठभागास स्पर्श केल्यावर हात सॅनिटायझ करा. घरातील जागा चांगली हवेशीर असल्याचे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करा. 


खोकला किंवा शिंकताना आपल्या मुलांना आपले तोंड आणि नाक रूमालाने झाकायला सांगा. मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांना घरच्या घरी व्यायाम करायला मदत करा. मुलांना नियमितपणे पौष्टिक आहार द्या. बाहेरील तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन लहान मुलांना करू देऊ नका. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी लोकांशी बोलताना सामाजिक अंतर ठेवा.


4) कोविडशी लढण्यासाठी लहान मुलांना लस दिली जाईल का?
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु, या मोहिमेतून लहान मुलांना वगळण्यात आले आहे. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वेगवेगळी असते. त्यामुळे कोविड-१९ लस मुलांसाठी सुरक्षित आणि प्रभावी ठरेल का? याबाबत क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. त्यामुळे लस मुलांसाठी उपलब्ध होण्यासाठी थोडा वेळ लागेल. तोपर्यंत आपल्याला आपल्या मुलांना विषाणूंपासून वाचवावे लागेल.


5 )  मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम  (एमआयएस-सी) कोरोनातून ठिक झाल्यानंतर अनेक लहान मुलांना तीन ते चार आठवड्यानंतर मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम (एमआयएस-सी) हा आजार होऊ शकतो.


कोरोनातून बरे झाल्यानंतर मुलांना काही आठवड्यानंतर तीव्र ताप येणं, श्वास घेण्यास अडचण येत असल्यास, भूक लागत नसेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक रक्ताची आणि कोविड अँटिबॉडी चाचणी करून घ्या. कोरोनामुक्तीनंतर लहान मुलांना कोणताही आजार होऊ नये, यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारात योग्य तो बदल करणे आवश्यक आहे.


याशिवाय पालकांनी मुलांच्या झोपेच्या वेळा, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायामाकडे लक्ष द्यावेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी मुलांना फिरायला घेऊन जाणे शक्यतो टाळावेत. कोरोना व्यक्तिरिक्त कोणत्याही इतर आजारांच्या संसर्ग होऊ नये, यासाठी मुलांना फ्लू लस देणं आवश्यक आहे. जेणेकरून मुलांना कोणत्याही आजारापासून वाचवता येईल, असे  बालरोग तज्ज्ञ डॉ. तुषार पारीख यांनी सांगितले.