घरबसल्या होऊ शकते कोरोना टेस्ट; रिपोर्ट अवघ्या 30 मिनिटांत हातात
गेल्या वर्षभरापासून देश कोरोना व्हायरसशी लढा देतोय.
मुंबई : गेल्या वर्षभरापासून देश कोरोना व्हायरसशी लढा देतोय. तर नुकतंच जागतिक आरोग्य संस्थेने जगभरात तिसऱ्या लाटेला प्रारंभ झाला असल्याचं सांगितलंय. दरम्यान या लढ्यामध्ये भारताने अजून एक पाऊल पुढे टाकलं आहे. हैदराबादच्या एका प्रोफेसरने एक नवं किट ‘COVIHOME’ केलं आहे. हे भारतातील पहिलं रॅपिड इलेक्ट्रॉनिक कोविड टेस्ट किट आहे.
या किटच्या माध्यमातून अगदी सोप्या आणि सहजरित्या कोविड टेस्ट करता येणार आहे. या कोविड टेस्टचा रिझल्ट केवळ 30 मिनिटांमध्ये मिळणार आहे. या किटच्या माध्यमातून एक टेस्ट करण्यासाठी केवळ 300 रूपये इतका खर्च येणार आहे.
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी हैदराबादचे रिसर्चर प्रोफेसर शिव गोविंद सिंह यांनी हे आर्टिफिशीयल कोविड टेस्ट किट तयार केलं आहे. एकदा आयसीएमआरने याला मंजूरी दिली की या किटद्वारे घरी देखील कोविड टेस्ट करू शकणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जरी रूग्णाला लक्षणं असतील किंवा लक्षणं नसतील या कीटद्वारे टेस्ट केल्यानंतर 30 मिनिटांमध्ये रिझल्ट मिळू शकतो.
तज्ज्ञांची गरज नाही
या किटची एक मोठी खासियत म्हणजे टेस्ट करण्यासाठी RT-PCR टेस्ट सारखी मशिनची गरज नाही शिवाय ना तज्ज्ञांच्या सुपरविजनचीही गरज लागणार नाहीये. कोणतीही व्यक्ती या किटच्या माध्यमातून घरच्या घरी टेस्ट करू शकणार आहे.
हे किट तयार करणारे प्रोफेसर शिव गोविंद सिंह यांच्या मते कोविहोम किट कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करेल. कारण कोणत्याही मदतीशिवाय टेस्ट घरी सहज करता येणार आहे. सध्या देशात आरटी-पीसीआर, रॅपिड अँटिजेन तंत्रज्ञानाद्वारे प्रामुख्याने चाचणी केली जात आहे.