मुंबई : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशात लसीकरण मोहीमेला सुरवात करण्यात आली आहे. देशभरातील अनेक नागरिकांनी लसीचे डोसंही घेतले आहे. मात्र लसीचे डोस घेऊन देखील कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं. तर आता केंद्र सरकारने याबाबत खुलासा करत आकडेवारी जाहीर केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत कोरोनाची लस घेऊनही 2 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने 3 ऑगस्ट 2021 पर्यंतचा डेटा सांगितला आहे. यानुसार कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरी 2.6 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती सरकारच्या एजसिंनी गोळा केली आहे. आतापर्यंत देशात 53.14 करोड लोकांचं लसीकरण झालेलं आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, यामधील 1.71 लाख लोकांना कोरोनाची लागण ही लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर झाली. तर दुसरीकडे दोन्ही डोस घेतल्यानंतर एकूण 87,049 लोकांना संसर्ग झाला आहे. यामुळे स्पष्ट होतं की, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणारे एक लस घेण्यापेक्षा सुरक्षित आहेत.


आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं की, मंत्रालय ब्रेकथ्रू इन्फेक्शनला (लस घेतल्यानंतर संक्रमण) ट्रॅक करतंय. ट्रॅकिंगची प्रक्रिया येत्या आठवड्यात पोर्टलवर जारी होईल. मात्र ते सार्वजनिक केलं जाईल की नाही हे स्पष्ट नाही.


महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे 5 बळी


राज्यात डेल्टा प्लसमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 5 वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये रत्नागिरीतील दोन, तर मुंबई, बीड आणि रायगड मध्ये प्रत्येकी 1-1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आता ठाणे जिल्ह्यात आणखी एका डेल्टा प्लसच्या रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे आता राज्यात डेल्टा प्लस बाधितांची एकूण संख्या 66 झाली आहे. बाधितांपैकी दहा जणांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते. डेल्टा प्लसने मृत्यू झालेले पाचही रुग्ण 65 वर्षांवरील होते आणि त्यांना अतिजोखमीचे आजार होते.