मुंबई : देशातील 7 कोटी मधुमेही रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. मधुमेहावरील औषध सिटाग्लिप्टीनचा आता जन औषधात समावेश करण्यात आलाय. मधुमेहावरील सर्वात लोकप्रिय औषध मेटफॉर्मिन, जेनेरिक औषधांच्या यादीत आधीच समाविष्ट आहे, परंतु सिटाग्लिप्टीन हे आणखी प्रभावी औषध मानलं जातं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या औषधाचे वैशिष्ट्य म्हणजे ते टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांना खूप फायदेशीर आहे. हे औषध रक्तातील साखर खूप कमी करत नाही. याशिवाय या औषधामुळे हृदयाला कोणतीही हानी पोहोचत नाही, तर इतर अनेक मधुमेहाच्या औषधांमध्ये असे धोके समोर येण्याची शक्यता असते.


अत्यंत कमी किमतीत औषध उपलब्ध


बाजारात अडीचशे रुपये किंवा त्याहून अधिक किमतीत मिळणारे हे औषध आता खूपच स्वस्त झालंय. जनऔषधी स्टोअरमध्ये 10 टॅब्लेटचं पॅक आता फक्त ₹60 मध्ये उपलब्ध असणार आहे. सिटाग्लिप्टीन फॉस्फेट 50 मिलीग्रामच्या दहा गोळ्यांच्या पॅकेटची एमआरपी 60 रुपये आहे. 100 मिलीग्रामच्या गोळ्यांचं पॅकेट 100 रुपये आहे. 


भारतीय जन औषधी योजनाचे सीईओ रवी दधीच म्हणाले की, या सर्व प्रकारच्या औषधांच्या किमती ब्रँडेड औषधांपेक्षा 60 ते 70 टक्के कमी आहेत. त्याच औषधाच्या ब्रँडेड औषधांची किंमत 160 रुपयांपासून 258 रुपयांपर्यंत आहे.


सध्या देशात 8700 जनऔषधी स्टोअर्स 


जेनेरिक औषधांतर्गत, सीताग्लिप्टीन आणि मेटफॉर्मिनचे मिश्रण देखील लवकरच जन औषधी स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहे. सध्या भारतात 8700 जन औषधी स्टोअर्स असून 1600 औषधं विकली जातात. लवकरच या श्रेणीमध्ये आणखी 138 औषधांचा समावेश केला जाईल आणि स्वस्त दरात जेनेरिक औषधे म्हणून विकल्या जातील.