शरीराचे कार्य सुरळीतपणे सुरू राहावे यासाठी मूत्रपिंड म्हणजे किडनी हा अवयव फारच महत्त्वाचा असतो. मूत्रपिंड शरीर संतुलित राखण्याचे कार्य करतो. सुदृढ शरीरासाठी मूत्रपिंडाचे दैनंदिन कार्यही सुरळीत राहायला हवे. मूत्रपिंडाचे विकार जडत असताना शरीरात सौम्य लक्षणेही आढळून येत नाही. रुग्णाला असह्य वेदना होऊ लागल्या तोपर्यंत मूत्रपिंडाचचा आजार जीवघेणा ठरलेला असतो. या आजाराचे वेळीच निदान होणे आव्हानात्मक ठरते. वयाची तिशी पूर्ण होताच मूत्रपिंडाच्या आजारांशी निगडित सर्व चाचण्या कराव्यात जेणेकरून निदान आणि औषधोपचार सुरु करता येतील. मूत्रपिंडाच्या आजारावर वेळीच प्रतिबंध घालावा, असा डॉक्टर अजय शाह, व्यवस्थापकीय संचालक, निबर्ग अजय शहा प्रयोगशाळा सल्ला देतात. 


रक्तदाब तपासणी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उच्च रक्तदाब मूत्रपिंड विकाराचे मूळ कारण समजले जाते. शरीरातील रक्तदाब ठराविक कालांतराने तपासायला हवे. तुम्ही न चुकता रक्तदाब तपासत राहिलात तर उच्च रक्तदाबाची सुरुवात होताच या जीवघेण्या आजाराची कल्पना येते. उच्च रक्तदाबाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवले नाही तर दीर्घकालीन मूत्रपिंड विकाराचा धोका संभवतो. बरेचदा मूत्रपिंड निकामी होते. 


सिरम क्रिएटिन तपासणी 


सिरम क्रिएटिन हा मांसपेशींमधील दूषित पदार्थ मानला जातो. मूत्रपिंडाच्या दैनंदिन प्रक्रियेत सिरम क्रिएटिन शुद्ध होते. रक्तात सिरम क्रिएटिनची वाढ झाली की त्याचा थेट परिणाम मूत्रपिंडाच्या दैनंदिन कार्यावर होतो. रक्त तपासणीत सिरम क्रिएटिनचे नेमके प्रमाण समजते. रक्तातील सिरम क्रिएटिन कितपत वाढले आहे, हे जाणून घेण्यासाठी रक्त तपासणी हा एकमेव उपाय आहे. 


क्लोमेरुलर


रक्तातील सिरम क्रिएटिनचे प्रमाण, माणसाचे वय ,लिंग आणि मानववंशीय प्रजाती या सर्व घटकांवर शरीराची क्लोमेरुलर शुद्धीकरण प्रक्रिया अवलंबून असते. या प्रक्रियेत बिघाड झाला तर मूत्रपिंड निकामी होण्याची भीती असते. क्लोमेरुलर शुद्धीकरण दर घसरला तर मूत्रपिंड निकामी होण्याची सुरुवात झालीच समजावी. 


मूत्रचिकित्सा  


मूत्रचिकित्सा ही मूत्रपिंडाच्या कार्याची संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी केली जाते. मूत्रपिंडातून शरीराच्या इतर भागात जाणारी प्रथिने, रक्त आणि इतर घाणेरडे पदार्थ यांची तपासणी मूत्रचिकित्सेत होते. लघवीतून शरीरातील प्रथिने आणि रक्त जाणे हे मूत्रपिंड निकामी होत असल्याचे संकेत देतात. रुग्णांना मूत्रपिंडाचा आजार झाल्याचेही निदान होते. 


क्रिएटिन


लघवीतून शरीरावर फेकल्या जाणाऱ्या प्रथिने आणि क्रिएटिन बिघडत्या मूत्रपिंडाचे ठळक लक्षण समजले जाते. लघवीतून शरीराबाहेर प्रथिने आणि क्रिएटिन कितपत बाहेर फेकले जात आहे, यासाठी लघवीतील प्रथिने आणि क्रिएटिनचे प्रमाण मोजणारी तपासणी केली जाते. लघवीतून शरीरातील प्रथिनांचे थोडेफार प्रमाणही बाहेर फेकले गेले तर मूत्रपिंड निकामी होत असल्याची सुरुवात होते. शरीरातील मधुमेह किंवा उच्च रक्तदाब नियंत्रित नसल्यास मूत्रपिंडाला कितपत बाधा झाली आहे, हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर्स ही चाचणी सुचवतात. 


अल्ट्रासाउंड, सिटीस्कॅन


शरीरातील मूत्रपिंड आणि लघवीच्या मार्गाची नेमकी माहिती हवी असेल तर अल्ट्रासाउंड, सिटीस्कॅन आणि एमआरआय या सर्व चाचण्या कराव्या लागतात. मूत्रपिंडात खडा किंवा गाठ झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी डॉक्टर्स या तिन्ही चाचण्यांवर भर देतात. मूत्रपिंडाच्या कार्यपद्धतीत नेमका कुठे बिघाड झाला आहे याचे अचूक निदान तिन्ही तपासणीतून होते. 


अनुवांशिक तपासण्या


मूत्रपिंडाच्या बिघडत्या कार्यपद्धतीत काही अनुवंशिक आजारही कारणीभूत ठरतात. यात प्रामुख्याने पॉलिसिस्टिक मूत्रपिंड विकार आणि अल्प्रोसिंड्रोम हे दोन अनुवंशिक आजार दिसून येतात. अल्प्रोसिंड्रोम हा मित्रपिंडाच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांचा आजार बरेचदा अनुवंशिक असतो. 


मूत्रपिंडाच्या आजारातून बरे व्हायचे असेल तर या सर्व चाचण्या ठराविक कालांतराने व्हायलाच हव्यात. योग्य वेळी निदान आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधोपचार रुग्णाला मूत्रपिंडासारख्या गंभीर आजारातून वाचवतात. तुम्ही तिशीच्या टप्प्यात आलात तर आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. डॉक्टरांनी सुचवलेल्या सर्व शारीरिक तपासण्या प्राधान्याने पूर्ण करण्यावर प्रत्येकाचा भर असावा. शारीरिक वेदना, पूर्वीपासूनचे आजार याबाबतीत डॉक्टरांना प्रत्येकाने तपशीलवार माहिती द्यावी. शरीर सुदृढ असण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य अबाधित सुरू राहणे महत्त्वाचे आहे.