नियमितपणे मेकअप करताय? तुमचा मेकअप ठरतोय आरोग्यासाठी घातक
मेकअप करणाऱ्या महिलांनो सावधान व्हा...
अमर काणे, झी मीडिया : घरातून बाहेर पडताना मेकअप करता? नियमित मेअकप करणं तुम्हाला आवडत असेल....तर ही बातमी नक्कीत तुमच्यासाठी आहे. नेहमी मेकअप करणाऱ्या महिलांनो सावधान व्हा...कारण तुम्ही मेकअपसाठी वापरत असलेली लिपस्टीक आणि मस्करा तुमच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. अनेक ब्रँडेड मेकअप साहित्यांमध्ये विषारी रसायनांचं घातक प्रमाण आढळून आलंय. यामुळे कॅन्सरबरोबरच अन्य जीवघेणे आजार होण्याचा धोका उद्भवू शकतो.
जगातल्या अव्वल ब्युटी प्रोडक्टमध्ये अत्यंत विषारी रसायनं असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. अमेरिका आणि कॅनडामध्ये वापरल्या जाणा-या उत्पादनांमध्ये घातक फ्लोरीन आढळून आलंय. एन्व्हायर्नमेंट सायन्स अँड टेक्नोलॉजी लेटर्स या जर्नमध्ये याविषयीचा पेपर प्रसिद्ध झाला आहे.
या पेपरमध्ये नमूद केल्याप्रमाणे,
फाऊंडेशन्सच्या 63 टक्के ब्रँड्समध्ये फ्लोरीनचं जास्त प्रमाण आढळलं
वॉटरप्रुफ मस्काराचे तब्बल 83 टक्के ब्रँड
लाँग लास्टिंग लिपस्टिकच्या 62 टक्के ब्रँड्समध्ये घातक केमिकल आढळूलं
तपासण्यात आलेल्या 231 पैकी 52 टक्के उत्पादनांमध्ये घातक पदार्थ असल्याचं स्पष्ट .
तब्बल 88 टक्के उत्पादनांनी आपल्या कव्हरवर घातक केमिकल्सचं नाव छापणं टाळलंय.
फ्लोरीन आणि अन्य घातक केमिकल्समुळे कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. याबाबत बोलताना डॉ. पवन शहाणे म्हणाले, "फ्लोरीन किंवा बाकी केमिकल्स लिपबाम, आयलायनर किंवा मस्करामध्ये वापरले जातात. हे केमिकल्स ओठ किंवा डोळ्यांच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतात. परिणामी शरीरात या टॉक्सिक पदार्थांचं प्रमाण फार वाढू शकतो."
कॅन्सरबरोबरच थायरॉईड किंवा अनेक हार्मोनल आजार होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येतेय. हे संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच अमेरिकेमध्ये कायदा करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. घातक कॉस्मॅटिक्सचे दुष्परिणाम टाळायचे असतील, तर भारतातही त्यावर लगाम घालण्याची गरज असल्याचं म्हटलं जातंय.