सुरभि जगदीश, झी मीडिया, मुंबई : एमपीएससी परीक्षा पास होऊनही नोकरी न मिळाल्याने नुकतंच पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरूण मुलाने आत्महत्या केली आहे. यानंतर राज्य सरकारवर टीका करण्यात येतेय. अशातच आता राज्यातील आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम- अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या मानसेवी डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. डॉक्टरांनी या पत्राद्वारे आत्महत्येला परवानगी द्यावी अशी धक्कादायक मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल 281 डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. स्वप्नील लोणकरसारखे आम्हीही पुरते निराश आहोत अशी भावना आरोग्य विभागांतर्गत आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम- अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या मानसेवी डॉक्टरांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.


डॉक्टरांनी या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, "मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सरकारकडून गेली दोन दशकं राबवलं जातंय. या डॉक्टरांचं मानधन 24 हजारांहून थेट 40 हजार करण्याचा निर्णय 16-09-2020 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. मात्र याला 11 महिने उलटले असून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. यासाठीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत असून एकतर मानधनवाढ तात्काळ लागू करा किंवा आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या."


"24 हजार रूपयांमध्ये कुटुंब चालवणं कठीण आहे. परिणामी यातील काही डॉक्टरांनी आत्महत्या केल्यानंतर सरकार जागे होणार आहे का? या डॉक्टरांना कधीच न्याय मिळणार नाही का? उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसंच आदिवासी मंत्री मानधनवाढीचा निर्णय घेतात मग त्याची अंमलबजावणी कोणी करायची? 16 आदिवासी जिल्ह्यात दुर्गम भागात काम करणाऱ्या 281 डॉक्टरांना न्याय देणार?" असे सवालही डॉक्टरांनी पत्राद्वारे केले आहेत.