National Cancer Awareness Day: ब्लड कॅन्सरच्या सुरुवातीला शरीरात दिसून येतात `ही` लक्षणं, दुर्लक्ष करू नका
Blood Cancer Symptoms: सुरुवातीच्या टप्प्यात या रोगाची चिन्हे लक्षात येणं आव्हानात्मक असलं तरी चेतावणी चिन्हे लक्षात घेऊन त्वरित वैद्यकीय मदत घेणं हे वेळेवर निदान आणि प्रभावी उपचारांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
Blood Cancer Symptoms: रक्त कर्करोग ज्याला हेमॅटोलॉजिक कर्करोग देखील म्हणतात. हा रोगांचा एक असा समूह आहे जो रक्त, बोनमॅरो आणि लिंफोमा सिस्टिमवर परिणाम करू शकतो. यामध्ये ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायलोमा सह विविध प्रकारांचा समावेश आहे.
अहमदाबादमधील हेमॅटोलॉजिस्ट आणि लॅबमधील मॉलीक्युलर हेमेटून्कॉलॉजिस्ट डॉ. अर्पण मेहता यांनी म्हटलंय की, सुरुवातीच्या टप्प्यात या रोगाची चिन्हे लक्षात येणं आव्हानात्मक असलं तरी चेतावणी चिन्हे लक्षात घेऊन त्वरित वैद्यकीय मदत घेणं हे वेळेवर निदान आणि प्रभावी उपचारांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
अकारण थकवा
सातत्याने जाणवणारा जबरदस्त थकवा हे रक्त कर्करोगाचे लक्षण असू शकते. कर्करोग निरोगी रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये व्यत्यय आणतो ज्यामुळे अशक्तपणा येऊन थकवा येतो.
संक्रमणाचा वारंवार होणारा त्रास
रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे हे रक्ताच्या कर्करोगाचे महत्वाचे लक्षण आहे परिणामी माणूस वारंवार आणि उपचारास कठीण अशा संसर्गास बळी पडतो.
अकारण वजन कमी होणे
अचानक, विनाकारण वजन कमी होणे हे रक्त कर्करोगासह अनेक प्रकारच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. रोगाशी लढण्यासाठी शरीराची ऊर्जा खर्च झाल्याने हे घडते
सुजलेल्या लिम्फ नोडस्
खासकरून मान, बगल किंवा मांडीच्या सांध्याला आलेला फुगीरपणा हे लिम्फोमा- रक्त कर्करोगाच्या एका प्रकाराचे चिन्ह असू शकते.
जखम आणि रक्तस्त्राव
सहज जखम होणे, नाकातून रक्तस्त्राव होणे किंवा किरकोळ जखमांमुळे खुपवेळ रक्तस्त्राव होणे हे काही रक्त कर्करोगाशी संबंधित प्लेटलेट संख्या कमी झाल्यामुळे असू शकते.
हाडे दुखणे
रक्ताच्या कर्करोगाचा बोनमॅरोवर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे हाडे दुखू किंवा फ्रॅक्चर होऊ शकते.
ताप आणि रात्रीच्या वेळी घाम फुटणे
विनाकारण ताप येणे त्याच्या बरोबर रात्रीच्या वेळी घाम फुटणे लिम्फोमासह विशिष्ट रक्त कर्करोगाचे लक्षण असू शकते.
रक्ताच्या कर्करोगात वर दिलेल्या कारणाव्यतिरिक्त इतरही काही चिन्हे आणि लक्षणे असू शकतात हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
निदान आणि चाचण्या:
रक्ताच्या कर्करोगावर यशस्वी उपचारासाठी त्याचे लवकर निदान होणे गरजेचे आहे. यापैकी कोणतीही चिन्हे असल्याचे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. ते पुढील गोष्टी करून घ्यायला सांगू शकतात:
रक्त तपासणी
बऱ्याचदा रक्त कर्करोग झाल्याचे नेहमीच्या रक्त तपासणी मध्ये देखील लक्षात येते. रक्ताच्या प्रमाणात (सीबीसी) असलेल्या विसंगतीमुळे समस्या असल्याचे लक्षात येते जी पुढील तपासणी करण्यास भाग पाडते.
बोनमॅरोची तपासणी
बोनमॅरो ॲस्पीरेशन आणि बायोप्सी मध्ये बोनमॅरोच्या नमुन्याची तपासणी केली जाते. यामुळे रक्ताच्या कर्करोगाचा प्रकार आणि स्टेज लक्षात येते.
इमेजींग स्कॅन्स
सीटी स्कॅन, एमआरआय किंवा पीईटी सारख्या इमेजींग टेस्ट्समुळे रोगाचे प्रमाण आणि कोणत्या लिम्फ नोड्स किंवा अवयव सुजले आहेत हे समजण्यास मदत मिळू शकते.
लिम्फ नोड्स बायोप्सी
सुजलेल्या लिम्फ नोड्स समजल्यास त्यांच्यामध्ये कर्करोगाच्या पेशी आहेत का हे पाहण्यासाठी बायोप्सी करता येते.
अनुवांशिक चाचणी
ल्युकेमिया सारख्या काही रक्ताच्या कर्करोगात विशिष्ट अनुवांशिक उत्परिवर्तन आणि गुणसूत्र विकृती असतात ज्यामुळे उपचारांच्या निर्णयांवर परिणाम होऊ शकतो. अनुवांशिक चाचणी उपचार पद्धती ठरविण्यास फायदेशीर ठरू शकते.
स्टेजींग
स्टेजींगमुळे कर्करोग किती प्रमाणात पसरला आहे हे समजते ज्याची उपचार निर्णयात मदत होते
लवकर लक्षात येण्याचे फायदे:
डॉ. अर्पण मेहता सांगतात, रक्ताचा कर्करोग झाल्याचे जितक्या लवकर लक्षात येइल तितके चांगले कारण सुरुवातीच्या टप्प्यात केलेल्या उपचारांचा चांगला परिणाम होतो. उपचारांमध्ये केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, स्टेम सेल प्रत्यारोपण किंवा लक्ष्यित उपचारांचा समावेश असू शकतो. विशिष्ट दृष्टीकोन रक्त कर्करोगाचा प्रकार आणि स्टेज यावर अवलंबून असतो.
रक्त कर्करोगाची प्रारंभिक चेतावणी चिन्हे ओळखून त्वरीत वैद्यकीय तपासण्या केल्याने रोगनिदान आणि उपचार परिणामांमध्ये महत्त्वपूर्ण फरक पडू शकतो. नियमित तपासणी आणि डॉक्टरांशी मुक्तसंवाद यासारख्या रोगांचा सामना करताना फार महत्वपूर्ण आहे. तुम्हाला अथवा तुमच्या परिचितापैकी कुणाला यातील कोणतीही लक्षणे असल्याचे लक्षात आल्यास तपासणी आणि निदानासाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.