आईस्क्रीम, केक चवीनं खाताय? ही बातमी वाचून तुमची झोप उडेल
Health News : काही पदार्थ फक्त बच्चे कंपनीच्याच नव्हे, तर सर्वांच्या आवडीचे असतात. अशा पदार्थांमध्ये समावेश होतो तो म्हणजे आईस्क्रीम आणि केक्सचा.
Health News : आपण कितीही मोठे झालो तरीही काही पदार्थ पाहिल्यानंतर ते खाण्याचा मोह आपल्यालाही आवरत नाही. अशाच पदार्थांची नावं घ्यायची झाली तर, आईस्क्रीम आणि केकचा यामध्ये सर्रास समावेश होतो. तुम्हालाही हे पदार्थ आवडतात? ही माहिती वाचा आणि त्याचा गांभीर्यानं विचारही करा.
संशोधनातून सिद्ध झालंय की...
संशोधकांच्या मते जास्तीची साखर असणाऱ्या पदार्थांचा आरोग्यावर घातक परिणाम होतो. शीतपेय, आईस्क्रीम आणि केक हे त्यातलेच पदार्थ. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार या पदार्थांच्या प्रमाणाहून जास्तीच्या सेवनामुळं मुतखड्याचा (kidney stones) धोका वाढतो. साखरेचं प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचं सेवन करणाऱ्यांमध्ये मुतखड्याचा धोका 40 टक्क्यांनी जास्त असतो हे निरीक्षणातून समोर आलं आहे.
चीनच्या Dr Shan Yin यांनी यासंदर्भातील माहिती जगासमोर आणली असून, साखरेचं सेवन आणि मुतखड्याशी संबंधित हा पहिलाच संशोधनपर अहवाल असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. साखरेच्या सेवनावर नियंत्रण ठेवणं हा यावरील प्रतिबंधात्मक उपाय ठरू शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलं.
फक्त चीनच नव्हे, तर जगभरातील संशोधक आणि तज्ज्ञ मंडळींनी या मुद्द्याकडे गांभीर्यानं लक्ष देत त्यासंबंधीची निरीक्षणं नोंदवली असून, अनेकांचीच झोप उडवली आहे. British Association of Urological Surgeons च्या मते 11 व्यक्तींमधील दर एका व्यक्तीला जीवनकाळात एकदातरी मुतखड्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. यामध्ये स्थुलता, पोट फुगलेलं वाटणं, मधुमेह या प्राथमिक लक्षणांची शक्यता असते.
हेसुद्धा वाचा : उरले फक्त 2 दिवस... Chandrayaan 3 चंद्रापासून नेमकं किती किलोमीटर दूर? इस्रोची नवी Update पाहाच
जागतिक स्तरावर करण्यात आलेल्या या निरीक्षणामध्ये 28 हजार नागरिकांचा समावेश होता. या सर्व व्यक्तींच्या खाण्यापिण्याच्या सवयींमधून त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील साखरेच्या सेवनाचं प्रमाण निर्धारित करण्यात आलं होतं.
निरीक्षणातून काय हाती लागलं?
जागतिक स्तरावर झालेल्या या निरीक्षणानुसार ज्या व्यक्तींनी त्यांच्या उर्जास्त्रोतांपैकी 25 टक्के उर्जा वाढीव साखरेतून मिळवली आहे त्यांच्यामध्ये हा धोका 88 टक्के जास्त असून इतरांमध्ये मात्र हा धोका 5 टक्के असल्याचीच बाब समोर आली.
दरम्यान, शरीरातील साखरेचं वाढणारं प्रमाण पाहता साखर आणि त्याचा इतर व्याधींशी असणारा संबंध याबाबत आणखी अभ्यास केला जाणं गरजेचं असल्याचा मुद्दा डॉ. यिन यांनी अधोरेखित केला.