Fact Check : कोरोनामुळे दुधाचा रंग बदलला? महिलेच्या दाव्यामागील काय सत्य ?
या महिलेनं चक्क आपल्या स्तनातून येणा-या दुधाचा रंग बदलल्याचा दावा केला आहे.
नवी दिल्ली : कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांमध्ये वेगवेगळे साईड इफेक्ट दिसून येत आहेत. कोणाला अंग दुखी तर कोणाला आणखी काही त्रास होत आहेत. एका महिलेनं अजब दावा केला आहे. त्याची सध्या चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या महिलेनं चक्क आपल्या स्तनातून येणा-या दुधाचा रंग बदलल्याचा दावा केला आहे.
या महिलेनं दुधाचे फोटोही व्हायरल केले. या फोटोमध्ये एका पाऊचमध्ये पांढरं दूध तर दुस-या पाऊचमध्ये हिरवं दिसत आहे. अश्मिरी असं या दावा करणाऱ्या महिलेचं नावं आहे. दोन मुलांच्या आई असलेल्या अश्मिरीला काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
कोरोनातून बरी झाल्यानंतर मुलीला फिडिंग करत असताना दुधाचा रंग बदलल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर तिनं त्याचे फोटो काढून सोशल मीडियात व्हायरल केले. अश्मिरीच्या या दाव्यानं डॉक्टर्सही चक्रावले आहेत. खरंच हा कोरोनाचा साईड इफेक्ट असू शकतो का?
दुधाचा रंग हिरवा होण्यामागचं कारण काय ? असे अनेक प्रश्न तज्ज्ञांना पडले आहेत. झी 24 तासनं या दाव्यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला.
काय आहे सत्य ?
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकाही प्रकरणात ब्रेस्ट फीडपर्यंत व्हायरस पोहचल्याचं आढळून आलेलं नाही. एखाद्या महिलेच्या शरीरात पांढ-या पेशींची किंवा ल्यूकोसाईट्सची वाढ झाली तर दुधाचा रंग बदलू शकतो. मात्र सरसकट सर्वच महिलांमध्ये अशा प्रकारचा बदल दिसून येण्याची शक्यता नाही.
अश्मिरीचा दावा खरा असला तरी तो केवळ अपवाद आहे. त्यामुळे कोरोनामुळे दुधाचा रंग बदलतो, या दाव्यात कोणतंही तथ्य नाही. हे झी 24 तासच्या पडताळणीत समोर आलं आहे. त्यामुळे महिलेनं केलेला हा दावा खोटा ठरलं आहे.