पावसाळ्यात हे ५ पदार्थ खाताना विशेष काळजी घ्या!
पावसाळा येताच आपल्याला गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा आठवतो.
मुंबई : पावसाळा येताच आपल्याला गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा आठवतो. हे अनहेल्दी आहे, हे आपण सगळे जाणतो. पण पावसात त्याचा मोह आवरत नाही. याव्यतिरिक्त असे काही पदार्थ आहेत जे पावसाळ्यात खाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊया कोणते आहेत ते पदार्थ...
कापून ठेवलेली फळे:
फळे कापून लगेच खाणे अधिक चांगले. कारण त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा जंतू संसर्ग होत नाही. पॅक किंवा आधीच कापून ठेवलेल्या फळांना विशेषतः पावसाळ्यात जंतुसंसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. म्हणून फळे आणा, धुवा आणि घरीच कापून खा.
पालेभाज्या:
अनेक लोक पावसाळ्यात पालेभाज्या खात नाहीत. कारण त्यात माती, जंतू, किडे असण्याची शक्यता अधिक असते. परंतु, जर तुम्ही पावसाळ्यात पालेभाज्या खाणार असाल तर भाज्या स्वच्छ धुवा आणि मग शिजवा. भाज्या धुण्यासाठी गरम पाणी वापरा.
मासे:
खरंतर पावसाळा हा माशांसाठी प्रजननाचा काळ असल्याने या काळात मासे खाल्ले जात नाहीत. पण जर तुम्हाला मासे खूप आवडत असतील आणि तुम्ही ते खाणे टाळू शकत नसाल तर मासे ताजे असल्याची खात्री करून मगच विकत घ्या.
कार्बोनेटेड ड्रिंक्स:
कार्बोनेटेड ड्रिंक्स आरोग्यासाठी चांगले नसतात. त्यामुळे शरीरातील मिनरल्स कमी होतात आणि पचनसंस्था कमकुवत होते. आणि जर तुम्ही बर्फ घालून त्याचा आस्वाद घेतलात तर सर्दी होऊ शकते. याऐवजी तुम्ही गरम चहा किंवा सूप घेऊ शकता.
पाण्याचा अंश असलेली फळे:
पावसाळ्यात पाण्याचा अंश असलेली फळे म्हणजेच कलिंगड, टरबूज, इत्यादी खाणे टाळणे योग्य ठरेल. कारण अशा फळांना बॅक्टरीयाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याऐवजी बदाम, अक्रोड यांसारखा सुकामेवा अवश्य खा.