मुंबई : बदाम हा एक असा ड्राय फ्रूट आहे, जो प्रत्येकाला खाण्याचा सल्ला दिला जातो. बदामामध्ये व्हिटॅमिन ईचे गुणधर्म भरपूर असतात, जे आपल्या शरीरासाठीच नाही तर त्वचेसाठीही चांगले मानले जातात. तज्ज्ञांच्या मते, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटचे उत्तम स्रोत बदामामध्ये आढळतात. एवढेच नाही तर बदामाच्या सेवनाने मेंदूला देखील फायदा होतो आणि स्मरणशक्ती वाढण्यास देखील मदत होते. ज्यामुळे पालक देखील आपल्या मुलांना लहानपणापासून बदाम खायला देतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु तुम्हाला तर हे माहित असेल की, कोणत्याही गोष्टीच्या अती वापरामुळे त्याचा फायदा होण्यापेक्षा त्यामुळे नुकसानच होते. त्यामुळे हे लक्षात घ्या की, बदामाच्या ही अतिसेवनामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.


डोकं दुखणे


बर्‍याच लोकांना असे वाटते की, ते जितके जास्त बदाम खातील तितके जास्त व्हिटॅमिन ई शरीराला मिळतील. परंतु, तज्ज्ञांच्या मते कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात व्हिटॅमिन ईचे प्रमाण सुमारे 15 मिग्रॅ असावे. बदाम जास्त खाल्ल्यास आणि शरीरात व्हिटॅमिन ईचे प्रमाण 1000 मिलीग्रॅमपर्यंत पोहोचल्यास अतिसार किंवा डोकेदुखीसारख्या समस्या होण्याची भीती असते. त्यामुळे जर तुम्ही दररोज बदाम खात असाल आणि तुमचे डोकं दुखत असेल तर काही दिवसांसाठी बदाम खाणं टाळा. फरक तुम्हाला लगेच जाणवेल.


टॉक्सिक लेव्हल वाढणे


दररोज बदाम खाणं चांगले आहे, परंतु जास्त प्रमाणात ते खाल्ले तर शरीरातील टॉक्सिक लेव्हल वाढण्याचा धोका असतो. याचा श्‍वसनाच्या त्रासावर आणि मज्जासंस्थेवरही वाईट परिणाम होतो, असे सांगितले जाते. दिवसभरात फक्त 4 ते 5 बदाम खावेत आणि तेही भिजवून खावेत असा सल्ला दिला जातो.


वजन वाढणे


असे मानले जाते की, बदामामध्ये कॅलरीजचे प्रमाण थोडे जास्त असते आणि ते सतत सेवन केल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ लागते. शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करणे आवश्यक आहे, कारण असे न केल्याने वजन वाढू लागते. जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी तज्ज्ञांकडून कमीत कमी बदाम खाण्याचा सल्ला दिला आहे.


बद्धकोष्ठता


बदामामुळे अनेकदा लोकांना पोटाच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांमध्ये बद्धकोष्ठता देखील समाविष्ट आहे. बदाम पचवण्यासाठी हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे, त्यामुळे जे लोकं कमी पाणी पितात, त्यांनी जास्त बदाम खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची तक्रार सुरू होते. मात्र हे देखील लक्षात घ्या की, पाणी तुमच्या शरीरासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे त्याचे सेवन करत राहा.


(नोट : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.)