What is Dry Ice : गुरुग्राममधल्या एका रेस्तरांमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. लोकांना माऊथ फ्रेशनर (Mouth Freshener) म्हणून ड्राय आईस (Dry Ice) आणून देण्यात आला. पण ते खाल्ल्याने रेस्तरांमध्ये आलेल्या लोकांची तब्येत बिघडली. काहींना उलट्या सुरु झाल्या. तर काहींच्या तोंडातून रक्त पडू लागलं. या घटनेने एकच खळबळ उडाली. या लोकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यातल्या काहींची प्रकृती गंभीर होती, त्यांना आयसीयूमध्ये (ICU) भरती केलं. या घटनेनंतर रेस्तरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कारवाई करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुग्रामच्या सेक्टर 90 मधल्या रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील पाच जणांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्यांची प्रकृती इतकी बिघडली की, पाचही जणांना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागलं. 


ड्राय आईस म्हणजे काय?
ड्राय आईसला कोरडा बर्फ असं म्हणतात. हे कार्बन डाय ऑक्साईडचे (CO2) घनरूप आहे, ड्राय आईस खूप थंड असतो. सामान्य बर्फाचं तापमान उणे 2-3 अंश इतकं असतं. तर कोरड्या बर्फाचं तापमान उणे 80 अंशांपर्यंत असते. ड्राय आईस सामान्य बर्फासारखा ओला नसतो. त्याला स्पर्श करण्यासही मनाई केली जाते.  सामान्य तापमानात बर्फ वितळण्यास सुरुवात होतो, तर तापमान वाढल्यावर डाय आईस पाणी होण्याऐवजी वाफेच्या रूपात बाष्पीभवन होऊ लागतो.


कसा बनतो ड्राय आईस?
ड्राय बर्फ तयार करण्यासाठी, कार्बन डायऑक्साइड 109 डिग्री फॅरेनहाइटवर थंड करुन आणि संकुचित केला जातो, ज्यामुळे हा वायू बर्फ बनतो, त्यानंतर त्याचे लहान तुकडे केले जातात.


कुठे होतो याचा वापर?
ड्राय आईसचा वापर कुलिंगसाठी वापरला जातो. याशिवाय औषधं आणि फळं साठवण्यासाठीही याचा वापर होतो. फोटो शूटमध्ये सामान्य बर्फाच्या जागी ड्राय आईसचा वापर होतो. 


डाय आईस धोकादायक आहे का?
कार्बन डायऑक्साईड धोकादायक नसतं. पण ड्राय आईस सामान्य बर्फापेक्षा कितीतरी पटीने थंड असतो. त्यामुळे तो खाल्याने शरीरातील पेशी मारल्या जातात. याच कारणाने ग्लोव्ह्जशिवाय ड्राय आईसला हात लावण्यास किंवा   खाण्यास मनाई केली जाते. चुकून ड्राय आईस खाल्यास त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतात. 


डॉक्टर काय म्हणतात?
गुरुग्राममधल्या घटनेत लोकांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्या रेस्तरांमधील लोकांनी ड्राय आईस खाल्याने त्यांच्या नसांना फटका बसला आणि त्यामुळे त्या लोकांना रक्ताच्या उलट्या झाल्याचं डॉक्टारांनी सांगितलं.