कडक उन्हाळ्यामुळं पोटात आग पडलीये? रोजचा आहार असा असू द्यात!
Stomach Heat In Summer: उन्हाळ्यात शरीराची आग होणे, पोटात आग पडणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून तुम्ही हे घरगुती उपाय करुन पाहू शकता.
Stomach Heat In Summer: कडक उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. वाढत्या तापमानामुळं अंगाची काहिली होत आहे. वाढत्या उन्हामुळं आरोग्यही बिघडते. महाराष्ट्रात उष्माघाताचे काही रुग्णही सापडले आहेत. उन्हामुळं शरीरात उष्णता वाढते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळं पोटात उष्णता वाढते. पोटातील व शरीरातील उष्णता फक्त पाणी पिऊन शांत होत नाही. त्यासाठी योग्य आहार व उपाय करावे लागतात. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही पदार्थ मदत करु शकतात. या पदार्थांच्या सेवनाने शरीरातील उष्णता कमी करता येऊ शकते.
शरीरातील वा पोटातील उष्णता वाढल्यास अस्वस्थपणा जाणवणे किंवा चिडचिड होऊ शकते. त्यामुळं काही थंड पदार्थांचे सेवन केल्यास पोटातील आग शांत होऊ शकते. त्यामुळं आरोग्यही सुधारते. असे कोणते पदार्थ आहेत हे जाणून घेऊया.
>> पोटातील उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थ किंवा फळांचा आहारात समावेश करा. कलिंगड, काकडी, टरबूज किंवा खरबूज यासारख्या फळांचे सेवन करावे. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळं शरीरातील पाण्याची कमतरतादेखील भरुन काढली जाते.
>> शरीरात उष्णता जास्त झाली असल्यास जास्तीत जास्त पाणी असलेल्या पदारार्थांचा समावेश आहारात करायला हवा. दही, दूध, तूप यांचे सेवन करा. तुपाचा गुणधर्म थंड असल्याने पोटात थंडावा निर्माण होतो आणि उष्णता कमी होते.
>> पोटातील आग शांत करण्यासाठी थंड पेये प्या. ताक, उसाचा रस, नारळ पाणी यासारखे पेये घ्या. हे पेये पोटातील आग शांत करतील त्याचबरोबर शरीरातील उष्णताही बाहेर फेकतील.
>> उन्हाळ्याच्या दिवसात रोज वेळेवर जेवण करणे आवश्यक आहे. शक्यतो रात्री उशिरा जेवण करणे टाळावे. तसंच, या दिवसांत पेज किंवा खिचडी यासारखा हलका आहार घ्या.
>> तेलकट, तूपकट, जंक फुंड किंवा फास्ट फूड यासारखे पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसांत खाणे टाळावे. त्यामुळं पित्त, अपचन, गॅसचा त्रास होण्याची शक्यता असते.
>> पोटातील आग शांत करण्यासाठी पाण्यातून किंवा दूधातून सब्जाचे किंवा तुळशीचे बी टाकून त्याचे सेवन करावे. यामुळं पोटात थंडावा राहतो.
>> रोज सकाळी गुलकंदाचे सेवन करणेही खूप गुणकारी ठरते. गुलकंदाचा गुणधर्म थंड असतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)