शरीरातील `हे` 6 बदल देतात मीठ कमी खाण्याचे संकेत; तुम्हालाही या समस्या जाणवतात का?
Signs of Eating Too Much Salt: आपल्या शरीराला मिठाची आवश्यकता असते मात्र कोणतीही गोष्ट अधिक प्रमाणात सेवन केली तर त्याचा परिणाम शरीरावर होतो. मिठाच्या अती सेवनाचे संकेत आपलं शरीरच देत असतं. हे संकेत फक्त समजले पाहिजेत.
Eating Too Much Salt: जेवणात थोडं मीठ (Salt) कमी पडलं तरी चवीतला फरक आपल्याला लगेच जाणवतो. मात्र फार जास्त प्रमाणात मीठ खाणंही आरोग्यासाठी धोकादायक असतं. मिठाच्या अती सेवनामुळे आरोग्यासंदर्भातील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. साधारणपणे कोणतीही गोष्ट कमी किंवा जास्त प्रमाणात खाल्ली तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपलं शरीर आपल्याला याबद्दलचे संकेत देत असतं. मात्र हे संकेत आपल्याला समजायला हवेत. आज आपण मिठाच्या सेवनासंदर्भातील संकेत आणि मीठ जास्त झाल्यानंतर शरीर कशापद्धतीने आपल्याला इशारा देतं हे जाणून घेणार आहोत. चला तर पाहूयात कोणत्या 6 गोष्टींमधून मिठासंदर्भातील संकेत आपलं शरीर आपल्याला देत असतं...
उच्च रक्तदाब -
शरीरामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त झाल्यानंतर उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. रक्तदाबामधील हा फरक किडनीच्या माध्यमातून होतो. फार जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने किडनीची द्रव्य पदार्थ बाहेर फेकण्याची क्षमता प्रभावित होते. त्यामुळे रक्तदाब वाढण्याची समस्या निर्माण होते.
पोट फुगल्यासारखं वाटणे
जास्त प्रमाणात मीठ खाल्लं तर पोट फुगल्यासारखं वाटण्याची समस्या निर्माण होऊ शकते. जेवण झाल्यानंतर तुम्हालाही अनेकदा पोट फुगल्यासारखं वाटत असेल. किडनीमध्ये काही प्रमाणात सोडियम असतं. त्यामुळे जेवणातील मीठाच्या माध्यमातून जेव्हा अतिरिक्त सोडियम पोटात जातं तेव्हा किडनी सामान्यपणे जेवढं पाणी शरीराबाहेर फेकलं जातं तेवढं पाणी शरीराबाहेर फेकत नाही. शरीरामध्ये सोडियमचं प्रमाण अधिक असेल तर शरीरातील पाण्याचं प्रमाणही वाढतं.
झोप न येणे
तुम्ही झोपण्याआधी सोडियम अधिक असलेल्या पदार्थांचं सेवन केलं तर तुम्हाला चांगली झोप लागणार नाही. झोपेसंदर्भातील समस्या तुमच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरतील. रात्री झोपण्यापूर्वी जास्त मीठ असलेल्या गोष्टी खाल्ल्यास झोप न येणे, अस्वस्थ वाटणे आणि रात्री अनेकदा झोप मोड होण्यासारख्या समस्या जाणवतात.
घसा/तोंड कोरडं पडणे
जास्त मीठ असलेले पदार्थ खाल्ल्याने घसा आणि तोंड कोरडं पडतं. त्यामुळे वारंवार तहान लागते.
अस्वस्थ वाटणे
जेवणामध्ये फार मोठ्याप्रमाणात मीठ असेल तर तुमच्या पोटाचं गणित कोलमडतं. अस्वस्थ वाटणं, मळमळ होणं अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळेच मर्यादित प्रमाणात मिठाचं सेवन करणं कधीही फायद्याचं असतं. तसेच योग्य प्रमाणात पाण्याचं सेवन केलं तर शरीर डिहायड्रेट होत नाही आणि मळमळ होणं, अस्वस्थ वाटण्यासारख्या समस्या होण्याची शक्यता कमी होते.
हृदयासंदर्भातील समस्या
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयासंदर्भातील आजारांचा धोका वाढतो. त्यामुळेच आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी मीठ अगदीच मर्यादित प्रमाणात खायला हवं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)