मुंबई : अक्कलदाढ येत असताना अनेक प्रकारचे त्रास उद्भवतात. साधारणत: १७ ते २५ या वयात अक्कलदाढ येते; मात्र अनेकांना वयाच्या पंचवीशीनंतर अक्‍कलदाढ येते. अक्कलदाढ येताना त्याचा परिणाम इतर दातांना देखील होतो. आपल्या तोंडातील हे सर्वांत शेवटचे आणि मजबूत दात असतात. हे दात सर्वात शेवटी येत असल्यामुळे तोंडामध्ये या दाढेला तोंडात पूर्ण जागा मिळत नाही. त्यामुळे हे दात येताना इतरही दातांना ढकलतात. त्यामुळे हिरड्यांवर दाब येतो. त्यामुळे दातांमध्ये वेदना, हिरड्या सुजणे आणि अस्वस्थता आदी त्रास होतात.     


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्कलदाढ येताना फार वेदना होतात. पण त्यासह तोंडाला दुर्गंध, जेवताना त्रास होणे आणि डोकेदुखीचाही त्रास होतो. या वेदना थांबवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो.   


१) दातदुखीमुळे जर तुमच्या हिरड्यांमध्ये सुज आली असेल तर ग्लासभर कोमट पाण्यामध्ये मीठ टाका. या पाण्याने गुळण्या करा. मीठात दाहशामक आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने दातदुखीचा त्रास कमी होतो. 


२) खूपच तीव्र वेदना होत असतील तर दाताजवळ बर्फाचा तुकडा धरा. बर्फामुळे सुज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.  


३) चिमूटभर हिंगामध्ये मोसंबीच्या रसाचे काही थेंब मिसळा. ही पेस्ट कापसाच्या  बोळ्याने अक्कलदाढेजवळ लावा. यामुळे दातदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.  


४) दातदुखीवर हमखास फायदेशीर ठरणारा एक घरगुती उपाय म्हणजे लवंग.  लवंगामध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने तोंडातील किटाणुंचा नाश करण्यास फायदेशीर ठरतात. 
लवंगाचे तेलही दातदुखीचा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते.