नखांंचा पिवळेपणा दूर करेल `हा` घरगुती उपाय
नखांचा पिवळेपणा हटवण्यासाठी तुम्ही डार्क रंगाच्या नेलपेंट्स लावता का?
मुंबई : नखांचा पिवळेपणा हटवण्यासाठी तुम्ही डार्क रंगाच्या नेलपेंट्स लावता का? यामुळे तुम्ही जितके समस्येपासून दूर पळण्याचा प्रयत्न करताय ती अधिकच गंभीर होते. कारण सतत आणि डार्क रंगांची नेलपेंट लावणं हेच नखांच्या नुकसानाचं एक कारण आहे. मग हा नखांचा पिवळेपणा हटवण्यासाठी काही महागड्या ट्रीटमेंट्स घेण्याऐवजी ‘अॅपल सायडर व्हिनेगर’ हा घरगुती उपाय नक्की करून पहा. नियमित 10 -15 दिवस हा प्रयोग केल्याने तुम्हांला निश्चितच फायदा होईल.
कसे आहे ‘अॅपल सायडर व्हिनेगर’ उपयुक्त ?
‘अॅपल सायडर व्हिनेगर’दातांप्रमाणेच नखांचाही पिवळेपणादेखील कमी करतो. अॅपल सायडर व्हिनेगर मध्ये अॅसेटिक आणि मॅलिक अॅसिड असल्याने नखांचा पिवळेपणा कमी होतो. तसेच त्यातील अॅन्टीफंगल गुणधर्मामुळे संसर्ग दूर राहण्यासदेखील मदत होते. काही जणांच्या नखांवर पांढरे ठिपके पडलेले दिसतात. हे शरीरात कॅल्शियमची कमतरता आणि पचनक्रियेत बिघाड असल्याचे लक्षण आहे. ‘अॅपल सायडर व्हिनेगर’ प्यायल्यास पचन मार्गातील समस्या दूर होतात. यामुळे नखांवरील डागही कमी होतात.[
कसे वापराल हे मिश्रण ?
नखांवरील नेलपेंट काढा.
कपभर कोमट पाण्यात एक कप अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा.
या मिश्रणामध्ये 20-25 मिनिटे बोटं बुडवून ठेवा आणि काही वेळाने थंड पाण्याने हात स्वच्छ धुवा.
नखं कोरडी करून त्यावर ऑलिव्ह ऑईलने मसाज करा.
हा प्रयोग नियमित दिवसांतून दोनदा केल्यास नखांचा पिवळेपणा दूर होईल.