या ७ घरगुती उपायांनी दूर करा तोंडाची दुर्गंधी!
काही खाद्यपदार्थ व तोंडातील कोरडेपणा यामुळे तोंडात दुर्गंधी येऊ लागते.
मुंबई : काही खाद्यपदार्थ व तोंडातील कोरडेपणा यामुळे तोंडात दुर्गंधी येऊ लागते. घराबाहेर असताना तो कमी करण्यासाठी प्रत्येकवेळी तुम्ही ब्रश करु शकत नाही. तोंड स्वच्छ करण्यासाठी बाजारामध्ये अनेक माऊशवॉशनर उपलब्ध आहेत. मात्र घरातील काही नैसर्गिक पदार्थामुळे तोंडाचा दुर्गंध सहज दूर करता येतो. हे पदार्थ तुम्ही बाहेर जाताना देखील तुमच्या सोबत ठेऊ शकता.
मुखशुद्धीसाठी नैसर्गिक उपाय-
बडीसोप-
जेवण झाल्यावर आपल्याकडे बडीसोप खाण्याची पद्धत आहे. ही बडीसोप खाल्याने पचनशक्ती सुधारते. बडीसोप एक उत्तम माऊथफ्रेशनर देखील आहे. बडीसोपमुळे अधिक प्रमाणात लाळ निर्माण होते व जंतूंचा नाश होतो ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही. जेवणानंतर येणारे आंबट ढेकर व अॅसिडीटी बडीसोपमुळे कमी होते. दररोज थोडी बडीसोप चघळल्यामुळे तुमच्या तोंडातून चांगला सुगंध येऊ शकतो.
मिंट अथवा पुदीना-
बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक माऊथ फ्रेशनर्स मध्ये मिंट हा महत्त्वाचा घटक असतो. या पानांच्या ताज्या व थंडगार सुगंधामुळे तुम्हाला अधिक फ्रेश वाटू शकते. यासाठी पुदिन्याची काही पाने चघळा अथवा एक कप पुदिन्याचा चहा घ्या.
लवंग-
स्वयंपाकामध्ये लवंग चव व सुगंधासाठी वापरण्यात येते. पुर्वीपासून दातदुखत असल्यास लवंग वापरण्यात येत असल्यामुळे आजकाल टूथपेस्ट व माऊथवॉश मध्ये देखील लवंग वापरण्यात येते. लवंगमुळे तोंडाचा दुर्गंध कमी होतो कारण तिच्यामध्ये अॅन्टीबॅक्टेरीयल घटक असतात. तुम्ही कधीतरी एखादी लवंग नक्कीच चघळू शकता.
दालचिनी-
हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. दालचिनीमध्ये देखील अॅन्टीबॅक्टेरीयल घटक असल्यामुळे त्यामुळे तोंडाचा दुर्गंध कमी होतो. यासाठी तुम्ही एखादा दालचिनीचा तुकडा चघळू शकता किंवा दालचिनीचा एक कप चहा घेऊ शकता. त्याचप्रमाणे दालचिनीचे तुकडे पाण्यात उकळून ते तुम्ही माऊथवॉश करण्यासाठी देखील वापरु शकता.
वेलची
वेलचीला एक गोडसर व अॅरोमिक सुगंध येतो. त्यामुळे तुमच्या तोंडाला दुर्गंध येत असल्यास तोंडात वेलची ठेवा. किंवा जेवल्यानंतर वेलची घातलेला चहा घेण्यास हरकत नाही.
लिंबूवर्गीय फळे-
संत्री लिंबू या फळांमुळे तुमच्या लाळग्रंथीला चालना मिळते व भरपूर लाळ निर्माण होते. लाळेतील अॅसिड घटकांमुळे तोंडातील मृतपेशी व अन्नघटक दूर होतात.
धणे अथवा कोंथिबीर-
स्वयंपाकातील कांदा व लसूण या पदार्थांमुळे तोंडाला उग्र वास येतो. पण अन्नपदार्थावर कोथिंबीर टाकल्याने हा दुर्गंध कमी होऊ शकतो. जेवणानंतर कोथिंबीरींची काही पाने चघळा त्यामुळे तोंडांचा दुर्गंध निघून जाईल. किंवा चिमूटभर मीठासोबत धणे तव्यावर रोस्ट करा व चघळा.