मूतखड्याचा त्रास नेमका कशामुळे होतो?
आजकाल बदलत्या लाईफस्टाईलमुळे आरोग्यावर अनेक परिणाम होत आहेत.
मुंबई : आजकाल बदलत्या लाईफस्टाईलमुळे आरोग्यावर अनेक परिणाम होत आहेत. अशातच आबालवृद्धांमध्ये वाढणारा एक त्रास म्हणजे मूतखडा किंवा किडनीस्टोन. मूतखड्याचा त्रास अत्यंत वेदनादायी असल्याने त्यामधून सुटका मिळवण्यासाठी वेळीच त्याचं निदान करणं आवश्यक आहे.
मूतखडा सुरूवातीच्या टप्प्यावर असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक नैसर्गिक आणि घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. मात्र मूतखड्याचा आकार मोठा असल्यास त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. पण हा मूतखड्याचा त्रास नेमका कशामुळे निर्माण होतो हे तुमच्या लक्षात आले तर त्यावर मात करणं सोपं आहे. मूतखडा टाळायचाय ? 'या' पदार्थांपासून रहा दूर
कशामुळे होतो मूतखड्याचा त्रास
शरीरातील घातक पदार्थ मूत्राच्या मार्गे बाहेर पडतात. मात्र जेव्हा त्याच्या निर्मितीचे प्रमाण कमी होते तेव्हा मूतखडा होतो.
शरीरातून अनेक द्रव्य घटक घाम, जुलाब याद्वारादेखील बाहेर पडतात. कष्टाची कामं करताना शरीरात पाण्याचे आवश्यक प्रमाण टिकून न राहिल्यास त्याचा त्रास होतो. म्हणून कष्टाची कामं करताना पाणी प्या. अन्यथा लघवीमध्ये क्षार व इतर घटकांचे विरघळण्याचे प्रमाण कमी झाल्याने मूतखडा निर्माण होण्याचं प्रमाण वाढतं.
मूत्रमार्गामध्ये जंतूसंसर्गामुळे इंफेक्शन झाल्याने, प्रोटिन घटक जमा झाल्याने त्याचे रूपांतर मूतखड्यामध्ये होऊ शकते.
शरीरात युरिक अॅसिडचं प्रमाण वाढल्यानेही मूतखड्याचा त्रास वाढू शकतो.
गर्भारपणात प्रोजेस्टेरॉनचा स्त्राव होतो. यामुळे लघवीचा वेग मंदावतो. परिणामी खडे निर्माण होतात.
फार काळ बेडला खिळलेल्या रूग्णांमध्ये हालचाल न झाल्यानेही मूतखड्याचा त्रास वाढू शकतो.
पाणी कमी प्रमाणात प्यायल्याने मूतखड्याचा त्रास होतो. कारण पाण्याच्या अभावामुळे लघवीतील न विरघळलेल्या ऑक्सलेटचे प्रमाण वाढते. मूतखड्याचा त्रास दूर करणारे नैसर्गिक उपाय