सावधान! केवळ दारूच नाही तर `या` सवयींमुळे लिव्हर खराब होऊ शकतं
यकृत अन्न पचवण्यासोबतच यकृत विष्ठेच्या रूपातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते.
How to Keep Your Liver Healthy: शरीरातील प्रत्येक अवयवाचं महत्त्व असून वेगवेगळी कार्य करत असतं. काही अवयव आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. जर हे अवयव निकामी झाले तर मृत्यू ओढावू शकतो. त्यामुळे या अवयवांची काळजी घेणं गरजेचं आहे. शरीराचा असाच एक भाग म्हणजे यकृत (Liver). अन्न पचवण्यासोबतच यकृत विष्ठेच्या रूपातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. यामुळेच यकृत निरोगी असणं गरजेचं आहे. केवळ दारू प्यायल्याने यकृत खराब होते, असा सर्वसाधारण समज आहे, पण तसे नाही. आपल्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टींमुळे यकृताला अपाय होण्याची शक्यता असते. यकृत कोणत्या सवयींमुळे खराब होतं जाणून घ्या
1. धूम्रपान: काही लोक सिगारेट मोठ्या प्रमाणात ओढतात. धुम्रपानामुळे यकृताला ईजा होते. वास्तविक, सिगारेटच्या धुरात विषारी रसायने असतात, जी हळूहळू यकृतापर्यंत पोहोचतात आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करतात. याचा परिणाम म्हणून यकृत मुक्त रॅडिकल्स तयार करू लागते आणि यामुळे यकृताच्या पेशींना हानी पोहोचते.
2. साखरेचं अतिसेवन: आहारात साखरेचा अतिरेक केल्याने यकृताचेही नुकसान होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक जण साखर खात नाही, पण समस्या इथेच संपत नाही. खरी समस्या फ्रक्टोजची आहे, जी ब्रेड, आइस्क्रीम, ज्यूस आणि सोडा यांसारख्या पदार्थांमध्ये असते. मानवी शरीरातील बहुतेक पेशी ग्लुकोजचे चयापचय करू शकतात, परंतु केवळ यकृत पेशी फ्रक्टोज हाताळू शकतात. अशा परिस्थितीत, जर एखाद्या व्यक्तीने वेळोवेळी जास्त प्रमाणात फ्रक्टोजचे सेवन केले तर ते यकृताचे नुकसान करते.
3. पॅकबंद अन्न: डॉक्टर सांगतात की पॅकबंद अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्याने यकृताला नुकसान होते. पॅकेज्ड फूडमध्ये अॅडिटीव्ह, प्रिझर्व्हेटिव्ह आणि फ्लेवरिंग्जचा वापर जास्त केला जातो. या सर्व गोष्टी यकृतासाठी हानिकारक ठरू शकतात.
4. औषधांचं अतिसेवन: जास्त प्रमाणात औषध घेतल्याने यकृत खराब होऊ शकते. काही औषधांचे डोस इतके स्ट्राँग असतात की जास्त प्रमाणात सेवन केल्याने यकृत खराब होऊ शकते.
5. असुरक्षित लैंगिक संबंध: एकापेक्षा जास्त जोडीदारांसोबत लैंगिक संबंध असणे यकृताच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. यामुळे एखाद्या व्यक्तीला हिपॅटायटीसची लागण होऊ शकते. हिपॅटायटीस सी हा संभाव्य घातक यकृत रोग आहे जो लैंगिकरित्या संक्रमित होतो.
6. पाण्याचं कमी प्रमाणात सेवन: जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, याबद्दल तुम्ही अनेकदा वाचले असेल. डॉक्टर सहसा दिवसातून जास्तीत जास्त पाणी पिण्याची सल्ला देतात. जे सुमारे 2 लीटर असते. काही डॉक्टरांच्या मते, तहान लागली नसली तरी पाणी पिणं गरजेचं आहे.
7. अपुरी झोप: झोप शरीरासाठी खूप महत्वाची आहे. पुरेशी झोप न मिळाल्याने शरीरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात, निद्रानाशामुळे तुमच्या यकृतालाही नुकसान होऊ शकते. खरं तर, पुरेशी झोप न मिळाल्याने यकृतामध्ये ऑक्सिडेटिव्ह ताण येऊ शकतो. याशिवाय निद्रानाशाचा त्रास असलेल्या लोकांना मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार यासारखे गंभीर आजार होतात.