हिवाळ्यात या ५ कारणांंसाठी हृद्याविकाराच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यायलाच हवी
थंडीच्या दिवसात केवळ सर्दी-खोकला आणि अस्थमाचा त्रास वाढतो असे नाही. तर यासोबतच हृद्यविकारांचा धोका वाढण्याचे प्रमाणदेखील अधिक असते.
मुंबई : थंडीच्या दिवसात केवळ सर्दी-खोकला आणि अस्थमाचा त्रास वाढतो असे नाही. तर यासोबतच हृद्यविकारांचा धोका वाढण्याचे प्रमाणदेखील अधिक असते.
हिवाळ्यात हृद्यविकाराचा झटका येण्याची शक्यता दाट असते. मात्र त्याबाबत पुरेशी सजगता नसल्याने विशेष काळजी घेतली जात नाही. नवी दिल्ली येथील एक्सकॉर्ट हार्ट इंस्टिट्युशन आणि रिसर्च सेंटरचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर डॉ. टी.एस. क्लेर यांनी यांनी थंडीच्या दिवसात हृद्यविकाराच्या रूग्णांनी कशी आणि कोणती काळजी घ्यावी याबाबत दिलेला हा खास सल्ला तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरेल.
1. हायपोथरमिया :
हायपोथरमिया म्हणजेच अचानक शरीराचे तापमान कमी होणे. हिवाळ्यात गरम कपडे घातले तरीही शरीराचे तापमान अचानक कमी होऊ शकते. पुरेसे आणि योग्य गरम न घालणे हृद्यविकाराच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते. अचानक शरीरात उर्जा निर्माण होण्याची क्षमता थांबल्याने त्रास होऊ शकतो. म्हणूनच हिवाळ्यात हृद्यविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. हृद्यविकाराच्या रुग्णांना हवेत गारवा वाढल्यास छातीत दुखण्याची समस्या वाढते.
2. हृद्यावरील अतिताण :
थंडीच्या दिवसात शरीरात रक्तभिसरणाचे काम करण्यासाठी हृद्याला इतर दिवसांच्या तुलनेत अधिक काम करावे लागते. यामुळे या दिवसात रक्तदाब वाढतो. परिणामी हृद्यावर त्याचा ताण आल्याने झटका किंवा निकामी होण्याचे प्रमाण अधिक वाढते.
3. अपुरा ऑक्सिजनचा पुरवठा:
अचानक शरीराचे तापमान कमी झाल्याने रक्तवाहिन्या आणि धमन्यादेखील आकुंचन पावतात. यामुळे हृद्याला होणार्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये कमतरता निर्माण झाल्याने हृद्याचे कार्य मंदावते.
4. व्हिटॅमिन डीची कमतरता :
शरीरात व्हिटामिन डीचे प्रमाण कमी असणे हेदेखील हृद्य निकामी होणे, हृद्यविकाराचा झटका येणे, स्ट्रोक किंवा कार्डियोव्हस्क्युलर डिसिजेस, रक्तदाब किंवा मधूमेह वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. हिवाळ्याच्या दिवसात व्हिटॅमिन डी कमी असणे म्हणजे हृद्याचे कार्य कमकुवत होणे होय.
5. कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण वाढते :
हृद्यविकाराच्या रुग्णांना ‘कोलेस्ट्रेरॉल’ हा कायमच त्रासदायक ठरतो. बदलत्या ऋतूनुसार कोलेस्टेरॉलचे प्रमाणदेखील कमी-जास्त होत असते. त्यामुळे बॉर्डरलाईन कोलेस्ट्रेरॉल असणार्यांमध्ये हिवाळ्यात हृद्यविकारांचे प्रमाण वाढलेले दिसते.
कोणती विशेष काळजी घ्याल ?
अचानक शरीराचे तापमान कमी होऊ नये म्हणून पुरेसे गरम कपडे घाला.
अतिकाम करणे टाळा. या दिवसात हृद्यावर ताण असतो. शरीराचे तापमान कमी होणे सोबत सतत कष्टाचे काम करणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे काम आणि व्यायामानंतर योग्य काळजी आणि आराम घ्या.
हिवाळ्यात हृद्याशी निगडीत कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. छातीत दुखणे, थकवा जाणवणे, श्वसनात त्रास जाणवणे ही हृद्यविकाराची लक्षण आहेत.