दूधी भोपळा जीवघेणा ठरण्याआधीच तो कसा ओळखाल?
अनेकदा लोकांना नैसर्गिक उपाय हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आणि दुष्परिणाम रहित वाटतात.
मुंबई : अनेकदा लोकांना नैसर्गिक उपाय हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आणि दुष्परिणाम रहित वाटतात. मात्र वास्तावात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, अंधानुकरण केल्याने हेच उपाय जीवघेणे ठरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
वजन घटवणे, मधूमेह, युरीन इंफेक्शन यावर परिणामकारक ठरणारा दूधीचा रस जगभरात अनेकांसाठी जीवघेणा ठरला आहे. डीटॉक्स प्लॅन ठरवताना अनेकजण दिवसाची सुरूवात फळभाज्यांच्या रसाने करतात. मात्र अशावेळेस पुरेशी काळजी न घेतल्यास ते जीवघेणे ठरल्याची घटना नुकतीच पुण्यात घडली आहे.
दूधीचा रस कधी ठरतो जीवघेणा?
प्रत्येक दूधीचा रस हा जीवघेणा नसतो. मात्र दूधी ही फळभाजी Cucurbitaceae प्रकारातील असते. जेव्हा फळभाजीमध्ये cucurbitacin हे विषारी द्रव्य वाढते तेव्हा त्याची चव बदलते. कडवट बीयांमुळेही हे फळ कडू होते. अशाप्रकारची भाजी थेट शरीरात गेल्यास आरोग्याला धोका निर्माण होतो. दूधीप्रमाणेच काकाडीदेखील कडवट होण्याची शक्यता असते.
वेळीच कसा ओळखाल धोका ?
दूधी, काकडी, भोपळा अशा Cucurbitaceae प्रकारातील भाज्यांचा आहारात थेट समावेश करण्यापूर्वी त्याचा लहानसा तुकडा चावून बघा.
भाजीचा तुकडा कडवट चवीचा जाणवल्यास त्याचा आहारात समावेश करणं टाळा.
प्रामुख्याने दूधी भोपळ्यासारख्या फळभाज्या नीट शिजवून खाणंच आरोग्याला अधिक फायदेशीर आहेत.
बाजारात मिळणारा विकतचा रस पिणं टाळा. त्याऐवजी घरच्या घरी ताजा रस बनवून प्यावा. मात्र त्याआधी चव तपासून पाहायला विसरू नका.
दूधीच्या रसासोबत इतर भाज्यांचा रस मिसळून पिणं टाळा.
धोकादायक लक्षण -
विषारी रस पोटात गेल्यास अवघ्या काही मिनिटात उलटी, डायरीया, खूप प्रमाणात घाम येणे, अस्वस्थ वाटणं अशी लक्षण आढळतात.
या लक्षणांनंतर रूग्णाला तात्काळ वैद्यकीय मदत मिळणं गरजेचे आहे.
अशाप्रकारच्या विषारी घटकांच्या उतारावर ठोस औषध नसल्याने जगभरात अशाप्रकारे विषारी घटक पोटात जाणं हे काही मिनिटात जीववर बेतण्याचे प्रमाण अधिक आहे.