मुंबई :  लहान मुलांना चॉकलेट्स, कॅन्डीपासून दूर ठेवणं हे अत्यंत कठीण काम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अति चॉकलेट्स खाल्ल्याने लहान मुलांचे दात खराब होतात, पोटदुखीचा त्रास होतो तसेच लठ्ठपणाची समस्यादेखील वाढते. पण मुलांना अशा टेम्प्टींग पदार्थांपासून मारून-मुकटून लांब ठेवण्यापेक्षा काही हेल्दी पण टेस्टी पदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश करावा.
 
 मुलांना अवेळी लागणारी भूक शमवण्यासाठी प्रत्येकवेळी एनर्जी बार किंवा फळं फायदेशीर ठरत नाहीत. मग चॉकलेट ओट्स लॉलीपॉप हा टेस्टी हेल्दी पर्याय नक्की करून पहा. गोड चॉकलेट सोबत खुसखुशीत भाजलेले ओट्स अत्यंत चविष्ट लागतात. यासोबतच मुलांच्या आहारात अक्रोड, खजूर यासारख्या आरोग्यदायी सुकामेव्याच्या पदार्थांचीही  भर पडते. यामधून मुलांना मिनरल्स, व्हिटॅमिन्स यांचा पुरवठा होतो. त्यामुळे चवदार पदार्थांसोबतच आवश्यक पोषणद्रव्यांचीही गरज पूर्ण होते.म्हणूनच क्वचित प्रसंगी किंवा चीट डे  वेळेस या गोडाच्या पदार्थाचि चव लहान मुलांप्रमाणेच घरातील प्रौढ मंडळीही घेऊ शकतात. 


 साहित्य -:


¾ कप भाजलेले ओट्स
½ कप चिरलेला खजूर
3 टीस्पून कापलेले अक्रोड
150gms चिरलेले डार्क चॉकलेट
150gmsचिरलेले पांढरे चॉकलेट
लॉलिपॉप स्टिक
लॉलिपॉपसाठी कागद


कृती -:


थरमाकॉलच्या शीटवर अ‍ॅल्युमिनियम फॉईल पसरून ठेवा. यावर तुम्हांला लॉलीपॉप ठेवता येतील. तसेच गळणार्‍या चॉकलेटमुळे होणारा पसारा टाळण्यासही मदत होते.
मिक्सरच्या भांड्यामध्ये ओट्स, खजूर आणि अक्रोडचे काप एकत्र टाका. या मिश्रणाची बारीक पूड करा.
हाताला तूपाचे किंवा बटरचे ग्रिसिंग करा. त्यानंतर मिक्सरमधील भांड्यातील मिश्रणाचे लहान लहान ( लॉलीपॉपच्या आकाराचे ) गोळे करा.
गॅसवर डबल बॉयलर पद्धतीने डार्क आणि पांढरे चॉकलेट वेगवेगळ्या भांड्यामध्ये पातळ करा.
हे मिश्रण सामान्यपणे रुम टेम्परेचरला येईपर्यंत थंड होऊ द्या. मध्येमध्ये चॉकलेट हलवत रहा म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत.
लॉलीपॉपचे बॉल स्टिकवर नीट अडकवून चॉकलेटमध्ये बुडवा.  चॉकलेट सर्वत्र समान प्रमाणात चिकटेल याची खात्री करा.
त्यानंतर लॉलिपॉप स्टिक थर्माकॉलच्या शीटवर घट्ट रोवा आणि ती शीट ताबडतोब फ्रीजमध्ये ठेवा.
बॉल्स नीट सेट झाल्यावर स्टीकवरील गळलेले चॉकलेट नीट पुसा. त्यानंतर त्यावर लॉलिपॉप कागद लावा.
वेळेनुसार, लहान मुलांच्या पार्टीला हे झटपट आणि हेल्दी लॉलिपॉप एक मस्त पर्याय ठरतील.