मुंबई : नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, तुम्हाला जर राग येत असेल तर हे ब्रेन स्ट्रोकचे कारण असू शकते. अभ्यासात असे म्हटले आहे की, राग आणि जास्त शारीरिक श्रमामुळे व्यक्तीला स्ट्रोक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याचदा आपल्या अनहेल्दी लाईफ स्टाईलमुळे लोकांना अनेक मानसिक आजार उद्भवतात. ज्यामुळे लोकांना लवकर राग येतो आणि ते स्वत: कधी-कधी असे का वागतात हे त्यांचं त्यांना देखील कळत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयर्लंडच्या नॅशनल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास केला आणि त्यांना असे आढळले की ज्यांना स्ट्रोकचा झटका आला त्यापैकी बहुतेक लोक स्ट्रोकच्या एक तास आधी खूप रागावलेले होते किंवा नैराश्यात गेले होते. या अभ्यासाचे निष्कर्ष युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.


मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही


स्ट्रोक आल्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो किंवा मेंदूच्या आतील रक्तवाहिनी फुटते. दोन्ही प्रकरणांमध्ये पुरेसा ऑक्सिजन मेंदूपर्यंत पोहोचत नाही. याचा परिणाम असा होतो की मेंदूची क्रिया कार्य करू शकत नाही आणि अर्धांगवायूचा धोका देखील असतो.


स्थिती घातक असू शकते


ग्लोबल इंटरस्ट्रोक स्टडीचा भाग असलेल्या या संशोधनामध्ये, गंभीर स्ट्रोकच्या 13 हजार 462 प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला. आयर्लंडसह 32 देशांचा या अभ्यासात सहभाग होता.


आयर्लंडच्या नॅशनल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, जे लोक जास्त शारीरिक श्रम करतात त्यांनाही स्ट्रोकचा धोका असतो. अभ्यासात असे दिसून आले आहे की, स्ट्रोक  आलेल्या प्रत्येक 20 पैकी एक व्यक्ती खूप शारीरिक श्रम करत असे.


एनयूआय गॅलवे येथील क्लिनिकल एपिडेमियोलॉजीचे प्राध्यापक आणि या अभ्यासाचे प्रमुख अँड्र्यू स्मिथ यांच्या मते, "स्ट्रोक प्रतिबंध हा डॉक्टरांसाठी प्राधान्य आहे. प्रगत तंत्र असूनही, स्ट्रोकचा धोका सांगणे कठीण आहे. आमच्या अभ्यासात, कोणत्या घटकांमुळे स्ट्रोकचा धोका वाढतो हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला."


30 टक्के धोका वाढला


अँड्र्यू स्मिथ म्हणाले की, "संशोधनात असे आढळून आले की, भावनिक त्रासामुळे स्ट्रोकचा धोका 30 टक्क्यांनी वाढतो. हे देखील आढळून आले की जे जास्त शारीरिक श्रम करतात त्यांना पक्षाघाताचा धोका 60 टक्के जास्त असतो."