Corona : राज्यात एकाच दिवशी रूग्णसंख्येत 55 % वाढ, पुन्हा लागणार का लॉकडाऊन?
गेल्या 24 तासांत राज्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक 55 टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागलेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 9,923 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात एक्टिव्ह रुग्णांची संख्या 79,313 वर पोहोचली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातून कोरोनाचा भयावह आलेख समोर आला आहे. गेल्या 24 तासांत राज्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक 55 टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 3659 नवे कोरोनाचे रुग्ण आढळलेत. महाराष्ट्रातील दररोजच्या कोविड-19 प्रकरणांमध्ये ही 55% वाढ आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, महाराष्ट्रात मंगळवारी 3,659 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत येथे 1,781 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.
संपूर्ण देशात वाढतोय कोरोना
संपूर्ण देशात मंगळवारी कोरोनाचे 9923 रुग्ण आढळलेत. एक्टिव्ह प्रकरणांची संख्या 79,313 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, राष्ट्रीय कोविड -19 रिकव्हरी दर 98.61 टक्के नोंदवला गेलाय. मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाणे, देशातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर 2.55 टक्के होता आणि साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 2.67 टक्के होता.