मुंबई : गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाचा सामना केला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. कोरोना महामारी दरम्यान चिंता आणि नैराश्याच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान दिल्लीतील एका खासगी रुग्णालयाच्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीप्रमाणे, खाजगी रूग्णालयाच्या मानसिक आरोग्य विभागाने कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वेब-आधारित क्रॉस-सेक्शनल अभ्यास केला होता. या अभ्यासाने कोरोना महामारी दरम्यान देशातील लोकांमध्ये जागरूकता, चिंता आणि नैराश्याची लक्षणं जाणून घेण्यासाठी एक ऑनलाइन अभ्यास केला.


1211 लोकांनी घेतला होता भाग


इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेंटल हेल्थ सिस्टीममध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, 1,211 प्रतिसाद नोंदवले गेले. त्यापैकी 1,069 प्रतिसादांचे विश्लेषण करण्यात आलं. या अभ्यासानुसार, 44.6% लोकांमध्ये चिंतेची सौम्य लक्षणं दिसून आली. त्याच वेळी, चिंतेची मध्यम लक्षणं 30.1% मध्ये आढळली तर गंभीर चिंता असणारी लक्षणं 25.3% मध्ये आढळली.


या अभ्यासानुसार, 26.1% लोकांमध्ये सौम्य डिप्रेशन असल्याचं दिसून आलं. 16.7% मध्यमआणि 3.8% गंभीर डिप्रेशन होतं. लॉकडाऊनच्या चार आठवड्यांत लोकांकडून सेल्फ स्टडीच्या आधारे हा डेटा तयार करण्यात आला. यात सहभागी झालेले सर्व लोक भारताचे नागरिक होते आणि त्यांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त होते. 


डॉक्टरांनी सांगितलं की, कोणत्याही मोठ्या मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाही. या अभ्यासात वेब आधारित सर्वेक्षण सामान्य लोकांमध्ये प्रसारित करण्यात आले.