Coronavirus in Goa : दक्षिण गोव्यातील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये (BITS Pilani Campus) 24 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण (Corona Infected Students) झाल्याचं आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. यानंतर संपूर्ण कॅम्पस हॉट स्पॉट (hot spot areas) घोषित करण्यात आला. प्रवेश करण्यापूर्वी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं थर्मल स्कॅनिंग (thermal scanning) केलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण
BITS पिलानीमध्ये सुमारे 2,800 विद्यार्थी शिक्षण घेतात.गेल्या काही दिवसांत कॅम्पसमध्ये कोविड चाचणी करण्यात आली. यात 24 विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आलं आहे अशी माहिती  संस्थेचे जनसंपर्क अधिकारी अर्जुन हलर्णकर यांनी दिली आहे. त्यानंतर सर्व वर्ग बंद करण्यात आले असून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरु करण्यात आलं आहे. 


आणखी 8 नमुणे तपासणीसाठी
कॅम्पस व्यवस्थापनेनं वर्ग ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी कोविड चाचणीसाठी आणखी आठ नमुने पाठवण्यात आले आहेत. त्याच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचं अर्जुन हलर्णेकर यांनी सांगितलं. सर्व कार्यक्रम रद्द करण्याचाही निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.


खबरदारी म्हणून 2 ते 3 दिवसांपूर्वी आम्ही कोरोना चाचणी (Covid Test) करण्यास सुरुवात केली असल्याचं हलर्णकर यांनी सांगितलं. आमच्या प्रोटोकॉलनुसार विद्यार्थ्यांची चाचणी सुरू केली तेव्हा 24 विद्यार्थी कोरोना बाधित आढळले. असं असलंतरी कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त नाही. आरोग्य अधिकारी कॅम्पसमध्ये आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची तपासणी केली जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.


कॅम्पससाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी 
कोविडची प्रकरणे समोर आल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने कॅम्पससाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याची अंमलबजावणीही करण्यात आली आहे. यामध्ये कॅम्पसमधील सर्व लोकांची अनिवार्य स्क्रीनिंग, क्वारंटाइन सुविधा उभारणे, ऑफलाइन क्लासेस बंद करणे इत्यादींचा समावेश आहे.


खबरदारी घेण्याची गरज
देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्रासोबतच राज्य सरकारांनीही कोविडवरील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल केले आहेत. शाळा आणि महाविद्यालयेही सुरू झाली आहेत. रेस्टॉरंट्सपासून थिएटर्स आणि मार्केटपर्यंत मोठी गर्दी असते. 


लोकांनी मास्क घालणे जवळपास बंद केले आहे. अशा स्थितीत गोव्यातील BITS पिलानीमध्ये एकाच वेळी इतक्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होणं हा चिंतेचा विषय आहे.