त्वचेवर तीळ का दिसतात, त्यांचा कर्करोगाशी काय संबंध आहे? जाणून घ्या माहिती
तज्ज्ञांच्या मते तीळाचा रंग आणि आकार प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा असू शकतो.
मुंबई : तुम्ही हे पाहिलं असेल की, तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागात तीळ दिसू लागतात. काही तिळ पूर्वीपासून किंवा जन्मापासून आपल्या शरीरावर नसतात. ते काही काळाने आपल्या शरीरावरती दिसू लागतात. परंतु असे का होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? शरीरात ते का दिसू लागतात? तसेच बऱ्याचदा या तीळाचा रंग वेगवेगळा देखील असतो. मग यामागचे नेमकं काय कारण असू शकतं? बरेच लोक याचा संबंध कॅन्सरशी असल्याचे सांगतात. परंतु यामागे नेमकं काय कारण आहे. हे तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत.
तज्ज्ञांच्या मते तीळाचा रंग आणि आकार प्रत्येक व्यक्तीमध्ये बदलू शकतो. काही लोकांच्या त्वचेवर अधिक तीळ दिसतात, तर काहींच्या कमी असतात. याची अनेक कारणे आहेत, जाणून घ्या तिळ का येतात आणि त्यांचा कर्करोगाशी काय संबंध आहे?
तीळ का बाहेर पडतात, ते आधी समजून घ्या. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा त्वचेतील पेशी (मेलानोसाइट्स) एकाच ठिकाणी गुच्छांच्या स्वरूपात वाढू लागतात, तेव्हा ते तीळाचे रूप धारण करतात. या पेशी मेलेनिन तयार करतात. मेलेनिन एक रंगद्रव्य आहे जे तीळला रंग देतात.
बहुतेक तीळ हे आपल्याला बालपण आणि वाढत्या वयात उदयास येतात. यामध्ये असेही काही तीळ आहेत जे कालांतराने नाहीसे होतात. बहुतेक तीळांमुळे कोणतेही नुकसान होत नाही, परंतु काही प्रकरणांमध्ये त्यांचा संबंध कर्करोगाशी असू शकतो. त्यामुळे तीळचा आकार झपाट्याने बदलत असेल तर कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
जर तीळाचा आकार बदलत असेल, रंग बदलत असेल, त्याच्या कडा फाटल्या असतील, तिचा रंग गडद काळा झाला असेल, तीळच्या भागात खाज येत असेल किंवा त्यातून रक्तस्त्राव होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
त्वचेच्या कर्करोगाची ही लक्षणे असू शकतात. त्यामुळे अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
त्वचारोगतज्ज्ञ सांगतात, तीळ दूर करण्यासाठी अनेक वेळा घरगुती उपाय केले जातात. तीळ काढण्याचा कधीही प्रयत्न करू नका. यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो किंवा संसर्ग देखील होऊ शकतात.