#International YogaDay 2018 : सकाळ की संध्याकाळ - कधी करावा सूर्यनमस्कार ?
21 जून हा दिवस जगभरात योगदिन म्हणून साजरा केला जातो.
मुंबई : 21 जून हा दिवस जगभरात योगदिन म्हणून साजरा केला जातो. आजकाल प्रत्येकाची जीवनशैली ही अत्यंत तणावग्रस्त झाली आहे. कामातून वेळ काढून व्यायाम करणं, जीमला जाणं याचा अनेकांना कंटाळा येतेओ. पण आरोग्यासाठी दिवसभरातील किमान 10 मिनिटं राखून ठेवणं गरजेचे आहे.
केवळ एका सूर्यनमस्कारामध्ये अनेक आसनांचा समावेश असतो. त्यामुळे नियमित केवळ सूर्यनमस्कारानेदेखील अनेक आजारांना दूर ठेवणं शक्य आहे.
सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम आहे. त्याच्या 10 विविध स्थितींमध्ये विविध आसनं आहेत. मग सूर्यनमस्कार संध्याकाळी करणं तितकेच फायदेशीर आहे का ? या तुमच्या मनातील प्रश्नाला एक्सपर्टने दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
कधी कराल सूर्यनमस्कार ?
सूर्यनमस्कार केवळ सकाळी करावा असा काही नियम नाही. कामाच्या घाईत असणारे सूर्यनमस्कार संध्याकाळीदेखील करू शकतात. घरात कामांची, डब्बा तयार करण्याची प्रत्येक गृहिणीला सकाळी घाई असल्याने त्यांना वेळ मिळत नाही ही सबब दिली जाते. तसेच जी लोकं संध्याकाळी योगावर्गाला जातात ते सूर्यनमस्कार संध्याकाळी करतात.
सकाळी सूर्यनमस्कार करण्याचे फायदे
सकाळच्या वेळेस सूर्यदर्शन करून सूर्यनमस्कार करणं अधिक योग्य आहे. अशावेळेस सूर्याच्या किरणातून आपल्याला प्रसन्नता, उर्जा, चैतन्य मिळते. सकाळी ध्यानसाधना करताना सूर्यनमस्कार करत असाल तर सकाळची वेळ अधिक योग्य आहे. या वेळेस वातावरणात शांतता असते. मात्र केवळ स्वास्थ्यासाठी व्यायाम म्हणून सूर्यनमस्कार करणार असाल तर ते संध्याकाळीदेखील करता येऊ शकते.
सूर्यनमस्कार एक परिपूर्ण व्यायाम असल्याने ते सकाळी किंवा संध्याकाळी केले तरीही त्याचा आरोग्यावर चांगलाच परिणाम होणार आहे. पण सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. नियमित सूर्यनमस्कार केल्याने शरीरात रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. पचनक्रियेला चालना मिळते, वजन घटवण्यास मदत होते.
नवशिखांसाठी खास सल्ला
तुम्ही व्यायामाला, सूर्यनमस्काराला नुकतीच सुरूवात केली असेल तर अशावेळी सूर्यनमस्कार संध्याकाळच्या वेळेत करा. दिवसभर काम केल्यानंतर तुमचे शरीर अॅक्टीव्ह झालेले असते. सकाळच्या वेळेस शरीर त्या तुलनेत अधिक स्टीफ / कडक असते. नवशिख्यांनी सूर्यनमस्कार शिकताना तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. हळूहळू सरावाने वेग आणि अचूकता देखील वाढायलाही मदत होईल. सूर्यनमस्कार अधिक चांगल्याप्रकारे करणे शक्य झाल्यानंतर आणि सवयीचे झाल्यानंतर सकाळी सूर्यनमस्कार करायला सुरवात करा. तसेच त्यापूर्वी वॉर्म अप नक्की करा. यामुळे इजा होण्याचा धोका कमी होण्यास मदत होईल.