Johnsons Powder: आता बाजारात मिळणार नाही जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर, कारण...
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने केली मोठी घोषणा, टॅल्कम पावडरचं उत्पादन थांबवलं
Johnson & Johnson baby powder : जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरने बाजारात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पण आता तुम्हाला बाजारात जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर मिळणार नाही. कारण जॉन्सन अँड जॉन्सनने एक मोठी घोषणा केली आहे.
2023 पासून टॅल्कम पावडरचं (talcum powder) उत्पादन बंद करणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. टॅल्कम पावडर उत्पादनाविरोधातल्या खटल्यांमुळे अडचणीत आल्याने हा निर्णय घेतल्याचे कंपनीने स्पष्ट केलं आहे. कंपनीने आधीच अमेरिका आणि कॅनडामध्ये टॅल्कम पावडरचं उत्पादन थांबवलं आहे.
गेल्या काही वर्षांत कंपनीच्या बेबी पावडर उत्पादनावर कॅन्सरचे अनेक आरोप झाले. त्यामुळे कंपनीला दीर्घ कायदेशीर लढा द्यावा लागला. त्यातच अहवाल समोर आल्यानंतर कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीतही लक्षणीय घट झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी आता टॅल्क बेस्ड पावडरऐवजी स्टार्च बेस्ड पावडर तयार करण्याला प्राधान्य देणार आहे.
टॅल्कम पावडर म्हणजे काय?
टॅल्क हे नैसर्गिकरित्या आढळणारं एक खनिज आहे. त्यापासून टॅल्कम पावडर बनवली जाते. हे मॅग्नेशियम, सिलिकॉन, ऑक्सिजन आणि हायड्रोजनपासून बनलेलं आहे. टॅल्कचं रासायनिक नाव Mg3Si4O10(OH)2 असं आहे. कॉस्मेटिक तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यात ओलावा शोषून घेण्याची क्षमता आहे.
पण ब्युटी केअर उत्पादनांमध्ये टॅल्कच्या वापरावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. टॅल्कच्या वापराने कॅन्सर होतो असा निष्कर्ष काढण्यात आला. वास्तविक, जिथून टॅल्क काढला जातो, तिथून एस्बेस्टोस देखील सोडला जातो. एस्बेस्टोस, ज्याला अभ्रक म्हणूनही ओळखले जाते, हा सिलिकेट खनिजाचा एक प्रकार आहे. त्याची स्फटिक रचना वेगळी आहे. यामुळे शरीरातील पेशींचे नुकसान होतं.
पावडर सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा
मोठ्या प्रमाणावर आरोप झाल्यानंतरही जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने आपली उत्पादनं सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. पण उत्पादनं सुरक्षित असली तरी सातत्याने होणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या उत्पादनांमध्ये टॅल्कऐवजी कॉर्नस्टार्चचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.